अंबरनाथ: अंबरनाथमधील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होत नसल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराने नगरपालिकेच्या मिळकत विभाग प्रमुखाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. यानंतर अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून संबंधित तक्रारदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी सर्व कर्मचारी आणि अधिकारी पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडून होते.
अंबरनाथ शहरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रवीण गोसावी हे अंबरनाथ शहरातील अनधिकृत होर्डिंग्जबाबत मागील काही महिन्यांपासून नगरपालिकेत तक्रार करत होते. त्यांच्या तक्रारीनुसार नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी अंबरनाथमधील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई देखील सुरू केली. मात्र नंतर ही कारवाई थांबवल्याचा प्रवीण गोसावी यांचा आरोप होता. याबाबत जाब विचारण्यासाठी गोसावी हे आज अंबरनाथ नगरपालिकेचे मिळकत विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यात वाद होऊन प्रवीण गोसावी यांनी गायकवाड यांना मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच या घटनेनंतर काम बंद आंदोलन पुकारत प्रवीण गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केली आहे.
याबाबत प्रवीण गोसावी यांनी मात्र सचिन गायकवाड हेच आधी आपल्या अंगावर धावून आले आणि आपण प्रतिकार केल्याचा दावा केला आहे. हा सर्व प्रकार नगरपालिकेच्या कार्यालया मध्ये घडला असून ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणी दोन सीसीटीव्ही असून त्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत या घटनेचा निषेध केला असून संबंधित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी सर्व कर्मचारी आणि अधिकारी पोलीस ठाण्यात एकत्रित दबाव टाकण्यासाठी गेले होते. पोलीस प्रशासनाने देखील अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नेमके गोसावी आहेत कोण?
वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असलेले गोसावी हे वादग्रस्त व्यक्ती असून याआधी त्यांनी अंबरनाथ मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भर सभेच्या ठिकाणी कानाखाली लगावली होती. त्यावेळेस देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी देखील आक्रमक भूमिका घेत गोसावी यांना पालिका कार्यालयात बंदी घालावी अशी मागणी देखील लावून धरली आहे