ठाणे : बीएस ४ मानक असलेल्या एक हजार ५६१ वाहनांची नोंदणी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. यामुळे ठाणे आरटीओच्या तिजोरीत एक कोटी २२ लाखांहून अधिक रुपयांचा महसूल जमा झाला असून तो अवघ्या दोन दिवसांतील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देशात वाहन प्रदूषणाची मात्रा कमी व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार १ एप्रिलपासून नवीन वाहनांची नोंदणी करताना,ते बीएस ६ मानक या इंजिनचेच असावे असे म्हटले होते. त्यामुळे ३१ मार्च रोजी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात बीएस ४ इंजिन असलेल्या अखेरच्या ८०३ वाहनांची नोंदणी झाली होती. याचदरम्यान सुप्रीम कोर्टाने बीएस ४ या वाहनांची नोंदणी करण्यासाठी २९ ते ३० एप्रिल २०२० पर्यंत मुदत वाढवून दिली होती. या नोंदणीपोटी आरटीओत एक कोटी २२ लाख ५२ हजार ३७१ रुपये इतका महसूल जमा झाल्याची माहिती ठाणे आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली.शेवटच्या दोन दिवसांत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात १२८० दुचाकी, ८२ मोटार, ३१ बस, ७१ तीनचाकी प्रवासी वाहने आणि इतर सर्व मिळून एक हजार ५६१ वाहनांची नोंद झाली आहे.