टिटवाळा : गणेश मंदिर रोडवरील आयडीबीआय बँकेच्या एटीएममध्ये सापडलेले पैसे डॉ. नीता पाटील यांनी बँकेत जमा केले. बँक व्यवस्थापनाने व्यवहार तपासून सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्याच्याआधारे संबंधित व्यक्तीला बोलावून डॉ. पाटील यांच्यासमोर त्याचे पैसे परत केले.डॉ. पाटील या टिटवाळा परिसरात राहतात. शनिवारी दुपारी त्या बँकेच्या एटीएममध्ये गेल्या होत्या. तेथे एक व्यक्ती पैसे काढण्याचा प्रयत्न करत होती; मात्र बराच वेळ प्रयत्न करूनही पैसे न आल्याने ती व्यक्ती निघून गेली. त्यानंतर, लगेचच एटीएममध्ये गेलेल्या डॉ. पाटील यांना मशीनमधून नुकतीच बाहेर आलेली चार हजार रुपयांची रक्कम मिळाली. त्यानंतर, त्यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला;मात्र ती न सापडल्याने बँकेशी संपर्क करून त्यांना हा प्रकार कळवला. त्यांनी त्वरित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासून त्याआधारे त्या व्यक्तीचा शोध घेतला. ती व्यक्ती शेखर पुजारी असल्याचे समजले. त्यानंतर, पुजारी यांना बोलावून त्यांची रक्कम पाटील यांच्यासमोर देण्यात आली.चार रुपये असोत, चार हजार किंवा चार लाख ते कुणाच्या तरी मेहनतीचे असतात, ते त्याला परत करणे, हे आपले कर्तव्य असल्याचे डॉ. नीता पाटील यांनी सांगितले. तर, आयडीबीआय बँकेच्या टिटवाळा शाखेचे व्यवस्थापक किशोर एकबोटे म्हणाले की, व्यवहार सुरू असताना सर्व्हर डाउन झाल्यास अशी अडचण येऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी पूर्ण खातरजमा करूनच एटीएममधून बाहेर पडावे. बँकेचे खातेदार असलेले शेखर पुजारी यांनी डॉ. नीता पाटील यांचे आभार मानले.
एटीएममध्ये सापडलेले पैसे केले बँकेत जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 11:55 PM