उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी उल्हासनगरात; २५ कोटी निधीतील विकास कामाचे उद्घाटन करणार
By सदानंद नाईक | Published: January 5, 2024 08:02 PM2024-01-05T20:02:34+5:302024-01-05T20:02:40+5:30
अजित पवार हे पक्षाचे माजी गटनेते भारत गंगोत्री यांना दिलेल्या २५ कोटी निधीतील विकास कामाच्या उद्घाटनासाठी रविवारी उल्हासनगरात येणार आहेत.
उल्हासनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे माजी गटनेते भारत गंगोत्री यांना दिलेल्या २५ कोटी निधीतील विकास कामाच्या उद्घाटनासाठी रविवारी उल्हासनगरात येणार आहेत. यावेळी तरी शहराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उल्हासनगर महापालिकेचे माजी सभागृहनेते व गटनेते भारत गंगोत्री यांना त्यांच्या प्रभागातील विविध विकास कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या ३ वर्षांपूर्वी २५ कोटीचा निधी दिला होता. त्या निधीतून उभे राहिलेल्या विकास कामाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी दुपारी अड्डीच वाजता होणार आहेत. यावेळी पुष्पपवन उद्यान, नेताजी उद्यान, रस्ते आदी विकास कामाचे उदघाटन होणार असल्याची माहिती भारत गंगोत्री यांनी दिली आहे. मात्र राष्ट्रवादी शहराध्यक्ष पदाची निवड अद्याप झाली नसल्याने, यावेळी शहराध्यक्ष पदाची निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अजित पवारांनंतर मुख्यमंत्र्यांचा दौरा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी दिलेल्या २५ कोटीच्या निधीतील विकास कामाचे उदघाटनसाठी रविवारी उल्हासनगरात येणार आहेत. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध विकास कामाच्या उदघाटनाला येणार असून यामध्ये महापालिका रुग्णालय, सिंधुभवन, तहसील प्रांगणातील व प्रांत कार्यालयाची प्रशासकीय इमारत, तालुका क्रीडा संकुल आदींचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.