सदानंद नाईक, उल्हासनगर: राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारी अनिष्का ही राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक व आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुक्की अनिल जयसिंगांनी यांची मुलगी असल्याचे उघड झाले. नेहमी पोलीस संरक्षणात राहिलेले अनिल जयसिंगानी गेल्या ८ वर्षांपासून विविध गुन्ह्यात फरार आहे. उल्हासनगरात अनिल जयसिंगानी हे सुरवातीला काँग्रेस पक्षात होते. त्यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर दोनवेळा नगरसेवकांची निवडणूक लढविली होती. सन-२००२ मध्ये महापालिका सार्वजनिक निवडणुकीपूर्वी तत्कालीन आमदार पप्पु कलानी यांची जेल मधून मुक्तता झाल्यावर, शहरात कलानीमय वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा माजी आमदार ज्योती कलानी होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढविली जाऊन, राष्ट्रवादी पक्षाला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले. या कलानी लाटेत अनिल जयसिंगानी हे राष्ट्रवादी पक्षाकडून नगरसेवक पदी निवडून आले होते. नेहमी पोलीस संरक्षणात वावरणारा अनिल जयसिंगानी यांच्याकडे महागडे कुत्रे होते. पोलीस किंवा अन्य कोणी त्याच्या घरी गेल्यास, कुत्रे सोडून दिले जात होते.
वरिष्ठ राजकीय नेत्यांसोबत उठबस असलेले अनिल जयसिंगानी नगरसेवकपदी असतांना क्रिकेट सट्टा प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या घरी धाड टाकून गुन्हे दाखल झाल्यावर एकच खळबळ उडाली. तेंव्हा पासून जयसिंगानी नेहमी वादात राहिले. तसेच त्यांचे वडील अर्जुन जयसिंगांनी यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सांगतात. अनिल जयसिंगानी हे गेले ८ वर्षापासून विविध गुन्ह्यात फरार आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे म्हणून मुलगी अनिष्का हिने थेट उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पत्नीला १ कोटींची लाच देण्याचे आमिष दाखवून व ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मलबार हिल येथे गुन्हा दाखल होऊन अनिष्काला उल्हासनगर येथील घरातून अटक केली. तसेच तिच्या भावालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. अनिष्का हीने उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सोबत लगट केलीच कशी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा उल्हासनगराचा नामचीन गुंडा सोबतचा फोटो व्हायरल
केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे भिवंडी येथे आले होते. यावेळी न्यायालयाने ठाणे बंदी घातलेला उल्हासनगरचा नामचीन गुंड रोशन झा सोबत फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.