मीरारोड - मीरारोड - महामार्ग परिसरातील काशीगाव पोलीस ठाण्याचे उदघाटन व पालघर जिल्हा नियोजन समिती कडून मिळालेल्या २ कोटी ९८ लाख २९ हजार रुपयांच्या निधीमधुन एकुण २५ नवीन वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ऑनलाईन लोकार्पण केले . तर काशीगाव पोलीस ठाणे सुरु झाल्याने काशीमीरा पोलीस ठाण्याचा भार निम्म्याने कमी होऊन नागरिकांना किमान वेळेत अधिक चांगला प्रतिसाद देणे पोलिसांना शक्यहोणार असल्याचे यावेळी पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी सांगितले .
१४ मार्च रोजीच्या काशीगाव पोलीस ठाण्याच्या उदघाटन वेळी खासदार राजन विचारे , पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, मीरा भाईंदर महानगरपालीका आयुक्त संजय काटकर, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, आमदार गीता जैन , माजी आमदार मुजफर हुसेन, पोलीस उपायुक्त मुख्यालय जयंत बजबळे, गुन्हे शाखेचे अविनाश अंबुरे, परिमंडळ १ चे उपायुक्त प्रकाश गायकवाड, परिमंडळ ३ चे सुहास बावचे , भाजपा स्थानिक नेते ऍड . रवी व्यास आदी उपस्थित होते . काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राहुलकुमार पाटील यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीवेळी आयुक्तालयाकडे केवळ ६१ चारचाकी व ९९ दुचाकी वाहने उपलब्ध होती. जिल्हा नियोजन समिती ठाणे व पालघर यांचेकडून २०२१ ते २०२३ दरम्यान ३३ चारचाकी व ८६ दुचाकी वाहने प्राप्त झालेली आहेत. तसेच २०२३-२०२४ मध्ये ४८ चारचाकी वाहने प्राप्त झालेली आहेत. गुन्हे प्रतिबंधासाठी , आवश्यक गस्तीसाठी, महिला व बालकांविरुध्दचे गुन्हयांमध्ये तपासाकरीता, डायल-११२ प्रणालीमध्ये मदतीसाठी , गुन्हयांचा तपासा व गुन्हेगारांचा शोध घेणेकरीता या वाहनांचा वापर होणार आहे.
पोलीस ठाणे करिता महानगरपालिकेकडून ईमारतीचा तळमजला भाडेतत्वावर घेण्यात आला आहे . त्याचा भाडेखर्च पोलीस आयुक्तालयाच्या शासकीय निधीतुन तसेच सदर ईमारतीची डागडुजी, पार्टीशन व फर्निचर बाबतच्या खर्चाकरीता ठाणे जिल्हा नियोजन समिती कडून निधी प्राप्त झाला आहे. १ ऑक्टोबर २०२० पासुन मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले असुन सुरुवातीला १३ पोलीस ठाणे कार्यान्वित होते. मागील ३ वर्षांत प्रस्तावित ७ पैकी टप्याटप्याने आचोळे, मांडवी, पेल्हार, नायगांव पोलीस ठाणे व आज काशीगाव पोलीस ठाणे कार्यान्वित होत आहे.
काशीगाव पोलीस ठाण्याची हद्द निश्चितीबाबत २८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली गेली . काशीगाव पोलीस ठाण्याची निर्मिती मुळ काशीमीरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून करण्यात आली आहे. . मुळ काशीमीरा पोलीस ठाण्याचेक्षेत्रफळ २९.९० चौ.कि.मी. होते. त्यापैकी सुमारे २० चौ.कि.मी. एवढे क्षेत्रफळ काशीगांव पोलीस ठाण्याकडे वर्ग झाले असुन काशिमीरा पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ सुमारे ९.९० चौ. कि. मी. एवढे झाले आहे.
सन २०२३ मध्ये काशीमीरा पोलीस ठाणेत भाग १ ते ५ अंतर्गत दाखल गुन्हयांची संख्या ६२२, भाग ६ अंतर्गत १७० व भाग ३ अंतर्गत ५७ गुन्हे एवढी आहे. तसेच सन २०२३ मध्ये काशीमीरा पोलीस ठाणेस दाखल अदखलपात्र गुन्हयांची संख्या ३१७० एवढी आहे. काशीगाव पोलीस ठाणे निर्मीतीमुळे काशीमीरा पोलीस ठाणे अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांपैकी सुमारे ५० टक्के गुन्हयांचे विभाजन होईल. ज्वेने करून काशीमीरा पोलीस ठाण्यावरील ताण कमी झाल्यामुळे नागरीकांना किमान वेळेत चांगला प्रतिसाद देणे शक्य होईल.असे आयुक्त मधुकर पांडेय म्हणाले .