ठाणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आठ पोलिस आयुक्तालयातील तब्बल १२९ पोलिस निरीक्षकांच्या वेगवेगळया पोलिस आयुक्तालयात बदल्या झाल्या आहेत. यामध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ३८ निरीक्षकांच्या मुंबई शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि नाशिक या पोलीस आयुक्तालयात बदल्या झाल्या आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्र्यांच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड येथून ३१ निरीक्षकांची मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बदली झाली आहे. तर ठाण्यातून पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे २३ निरीक्षकांना पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यातील पिंपरी चिंचवड, पुणे शहर, ठाणे शहर, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर शहर, अमरावती शहर, सोलापूर या पोलीस आयुक्तालयातील १२९ पोलीस निरीक्षकांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ४१ पुणे शहर, त्या खालोखाल ३८ ठाणे शहर , १३ पिंपरी चिंचवड, नागपूर आणि नाशिक प्रत्येकी ११ तर छत्रपती संभाजी नगर शहरमधील सात , अमरावती- पाच आणि सोलापूरातील तीन निरीक्षकांचा यामध्ये समावेश आहे.
ठाण्यातील पोलीस निरीक्षक पुण्यात -ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातून सर्वाधिक १४ निरीक्षकांची पुणे शहरात बदली झाली आहे. तर ११ निरीक्षकांची मुंबई शहर, ९ पिंपरी चिंचवड, नाशिक तीन आणि एका निरीक्षकाची जालना येथे बदली झाली. सर्वाधिक २१ निरीक्षकांची पुण्यातून ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये दहा आणि नाशिकमध्ये सहा जणांना पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.