ठाणे-
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी अखेर काल राजभवनात पार पडला. आता खातेवाटपाची चर्चा होऊ लागली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हे सर्व कॅबिनेट मंत्री असणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यात आता कुणाला कोणतं खातं मिळणार याबाबत विचारण्यात आलं असता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
"शरद पवाराचं दु:ख जरा वेगळंय, ते आपल्या सर्वांनाच माहितीय"
मंत्र्यांचं खातेवाटप कधी होणार असं माध्यमांच्या प्रतिनिधींनी फडणवीस यांना विचारलं असता ते तर तुम्हीच करुन टाकलंय अशी मिश्किल टिप्पणी फडणवीसांनी केली. ते ठाण्यात 'लोकमत'च्या कार्यालयाच्या उदघाटनावेळी प्रसार माध्यमांशी बोलत होते.
"माध्यमांनीच खातेवाटप करुन टाकलं आहे. आमच्या करता खातेवाटप शिल्लकच ठेवलेलं नाही. पण तुम्ही जे खातेवाटप केलं आहे ते सपशेल चुकीचं ठरेल एवढं मी नक्की सांगतो", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या विधानामुळे नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपात शिंदे सरकार धक्कातंत्राचा वापर करेल अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपा मित्रपक्षांना कधीच धोका देत नाही- फडणवीस"बिहारमध्ये भाजपाचे ७५ आमदार निवडून आले. जदयूचे ४२ लोक निवडून आले तरीही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं. त्यामुळे भाजपा कधीच मित्र पक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रात शिवसेनेनं त्यावेळी आमच्या पाठित खंजीर खुपसला म्हणूनच आता खरी शिवसेना आमच्यासोबत आली", असं फडणवीस म्हणाले.