सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित असतांना विना मास्क नागरिकांवर सोमवारी कारवाई केली. कारवाई करण्यासाठी उपायुक्त अशोक नाईकवाडे हे प्रभाग अधिकाऱ्यांसह रस्त्यावर उतरून मास्क विना फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले.
उल्हासनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या २५०० पेक्षा जास्त असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. या दरम्यान विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यावर कारवाई करण्याची मागणी शहरातून होत होती. दरम्यान आयुक्त डॉ राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त मदन सोंडे कोरोना संसर्गामुळे होम कॉरंटाईन असल्याने, महापालिका कामकाजाचा सर्व भार उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्याकडे आला. व्यस्त कामकाजातून वेळ काढून त्यांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी चारही प्रभाग अधिकाऱ्यांसह पथकाला आदेश दिले. सोमवारी स्वतः रस्त्यावर उतरून पथकासह शहर पश्चिमेची झाडाझडती घेतली. यावेळी विना मास्क फिरणाऱ्या २५ पेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई करून दंडात्मक रक्कम वसूल केला. शहरवासियात मास्क बाबत जनजागृती व भीतीयुक्त आदर निर्माण करण्यासाठी प्रभाग समितीच्या पथकासह रस्त्यावर उतरल्याची माहिती नाईकवाडे यांनी दिली.
नागरिकांनी घरा बाहेर पडताना मास्क लावणे गरजेचे आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरूच राहण्याचे संकेत त्यांनी दिली. प्रभाग समिती क्रं-१ चे सहायक आयुक्त गणेश शिंपी, समिती क्रं-२ चे सहायक आयुक्त अनिल खतुरानी, समिती क्रं-३ चे सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली. कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करण्यासाठी उपायुक्त नाईकवाडी यांनी रिजेन्सी प्लाझा हॉटेल ताब्यात घेऊन त्याठिकाणी कोविड रुग्णालय सुरू केले. तसेच सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा असताना महापालिकेकडे १० दिवसाचा साठा असल्याची माहिती त्यांनी दिली