राजू काळे
भाईंदर - शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपप्रमुख शंकर विरकर यांनी गेल्या तीन दिवसांपासुन मीरा-भार्इंदर महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अधिकाऱ्यांच्या एकाच पदावर ठाण मांडण्याच्या प्रवृत्तीला विरोध दर्शविण्यासाठी धरणे आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन त्यांनी मागे घ्यावे, यासाठी शनिवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास पालिकेचे उपायुक्त विजयकुमार म्हसाळ व सहाय्यक आयुक्त स्वाती देशपांडे यांनी सुमारे पाऊण तास विरकर यांच्याशी चर्चा करुन विनंती केली.
पालिकेच्या या पोकळ आश्वासनाला मात्र भीक न घालता विरकर यांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे. परंतु, पालिकेत एकाच पदावर ठाण मांडलेल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रशासनाकडे अद्याप कोणताही सक्षम व त्या जागेसाठी आवश्यक असलेले पात्रताधारक अधिकारीच उपलब्ध नसल्याने त्या अधिकाऱ्यांची बदली कुठे करायची व त्यांच्या जागी कोणाची वर्णी लावावी, हा प्रश्न प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. तरी देखील त्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडुन सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यामुळे त्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारात कोणताही फरक न पडता पुन्हा येरे माझ्या मागल्याचाच प्रकार होणार असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा विरकर यांनी केला आहे. त्याला सत्ताधाऱ्यांकडुन मात्र पाठबळ मिळत असल्याचा आरोपही केला जात आहे. त्या अधिकाय््राांच्या सतत संपर्कात राहून आपली पोळी भाजून घेणारे सेनेतील काही अलिप्तवाद्यांनी या आंदोलनात सहभागी होण्यास अद्याप पाठ दाखविल्याने सेनेतील स्वार्थी गटबाजीची चर्चा सध्या रंगू लागली आहे. या आंदोलनाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रविंद्र फाटक यांनी जाहिर पाठींबा दर्शविल्याचे सांगण्यात येत असले तरी काही नगरसेवकांनी तर या आंदोलनातील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी काही पोशिंदे तैनात केल्याचे सुत्राकडुन सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या काही पदाधिकाय््राांनी देखील या आंदोलनात सहभाग घेत त्याला पाठींबा असल्याचे मत जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी व्यक्त केले आहे. परंतु, सेनेतील काही असंतुष्ट व अधिकारी धार्जिण्यांनी सुरु केलेला उपद्व्याप निंदनीय असल्याची चर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांत सुरु झाली आहे. दरम्यान हे आंदोलन प्रशासनाच्या ठोस कार्यवाहीनंतरच मागे घेणार असल्याचे विरकर यांनी जाहिर केल्याने त्या अधिकाय््राांना घाम फुटल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे त्यांनी सेनेतील काही पदाधिकाय््राांसह निकटवर्तीयांना विरकर यांची समजूत काढण्यासाठी कामाला लावल्याचे बोलले जात आहे. तसेच या आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी रविवारी शहरप्रमुख धनेश पाटील, उपशहरप्रमुख केसरसिंग, राजेश परब, प्पपू भिसे व काही नगरसेवकांना पाचारण केल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे हे आंदोलन आणखी चिघळणार असल्याची चर्चा आंदोलनकर्त्यांत सुरु झाली आहे.