कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेले उपायुक्त मिलिंद धाट हे सोमवारी मंत्रालयात पुन्हा रुजू झाले. धाट यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली होती. सप्टेंबरमध्ये हा कालावधी संपणार होता; परंतु तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना ते मनपातून तडकाफडकी कार्यमुक्त का झाले, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मनपा अधिकाऱ्यांमधील अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
धाट यांनी मनपाच्या सेवेत असताना सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण, वैद्यकीय आरोग्य विभाग, परिवहन, महिला व बालकल्याण विभाग, जनसंपर्क अशा विविध विभागांची जबाबदारी सांभाळली. परिवहन कर्मचाऱ्यांचा गेली २० वर्षे रखडलेला पदोन्नतीचा, तसेच कंत्राटी चालक व वाहकांना सेवेत कायम करण्याचा प्रश्न त्यांच्याच व्यवस्थापकपदाच्या कारकीर्दीत मार्गी लावण्यात आला. महिलांसाठीच्या तेजस्विनी बसचा मुद्दाही तीन वर्षे रखडला होता. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे लवकरच या बस उपक्रमात दाखल होणार आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत वैद्यकीय आरोग्य विभागाची जबाबदारी हाताळताना सुरू असलेल्या धावपळीत त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली. मात्र, कोविड योद्धा म्हणून अधिकाऱ्यांच्या झालेल्या सत्कारात त्यांना डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
----------------------------------
यासंदर्भात धाट यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर केडीएमसीत अधिकारी म्हणून काम केले असले तरी मी मूळचा डोंबिवलीकर आहे. मनपात सेवा बजावताना आपल्या जन्मभूमीची सेवा करण्याची संधी मिळणे हीच मोठी गौरवाची बाब आहे. त्याकरिता आपल्याला कोणत्याही सत्काराची अपेक्षा नसल्याचे सांगत मनपातून घेतलेल्या कार्यमुक्तीबाबत मात्र भाष्य करणे धाट यांनी टाळले.
---------------------------------