मीरारोड - मीरारोडच्या पेणकरपाडा येथील दफनभूमीचे आरक्षण रद्द करण्यासाठी स्थानिक सर्वपक्षीय शिष्टमंडळ आमदार व अधिकाऱ्यांना निवेदने देत असतानाच पोलीस उपायुक्त यांनी देखील महापालिकेला पत्र पाठवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता पाहता दफनभूमीसाठी अन्यत्र पर्यायी जागेचा विचार करावा असे कळवले आहे.
मीरा भाईंदर महापालिकेने पेणकरपाडा येथील दफनभूमीचे आरक्षण विकसित करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न चालवले आहेत. तर दुसरीकडे स्थानिक सर्वपक्षीय एकत्र आले असून त्यांनी दफनभूमीचे आरक्षण रद्द करण्याची मागणी करत उत्तन व काशीगाव येथील जागा सुचवली आहे.
शिष्टमंडळाने आमदार प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन निवेदन दिले असता आ. सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे विनंती करून याबाबत बैठक लावू व आपण स्थानिक नागरिकांच्या बाजूने असल्याचे आश्वस्त केले. दरम्यान परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी पेणकरपाड्यातील प्रमुख राजकारणी व नागरिक यांची बैठक बोलावली असता त्यात सर्वानीच एकमुखाने दफनभूमी विकसित करण्यास विरोध केला व आंदोलनाचा इशारा दिला.
त्या अनुषंगाने बजबळे यांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांना पत्र पाठवून पेणकरपाडा मधील प्रमुख लोकांची भूमिका स्पष्ट करत सध्या राज्यात, धार्मिक सांप्रदायिक व राजकीय घडत असून रमजान महिना सुरु होणार आहे. पेणकरपाडा येथे दफनभूमीचे काम सुरू केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने पर्यायी जागेचा विचार करण्यास त्यांनी पालिकेला सांगितले आहे.
पेणकरपाडामध्ये स्थानिक आगरी, मराठी सह अन्य हिंदू धर्मीय वस्ती असून मुस्लिम समाज येथे राहात नसल्याने त्यांची वस्ती असलेल्या भागात दफनभूमी करण्याची आमची भूमिका असल्याचे प्रभाकर गायकवाड यांनी सांगितले .