ठाणे : सेलिब्रिटी लसीकरण प्रकरणात चौकशी समितीचे अध्यक्ष असलेले आणि ग्लोबल कोविड सेंटरचा कारभार ज्यांच्या खांद्यावर होता, त्या उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याकडून ग्लोबल हॉस्पिटलचा पदभार तडकाफडकी काढून घेण्यात आला आहे. प्रशासकीय कारणास्तव त्यांची बदली केल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी त्यांच्या बदलीनंतर तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. तूर्तास त्यांना दुसरा कोणताही पदभार सोपविण्यात आलेला नाही. सध्या डॉ. अनिरुध्द माळगावकर यांच्या खांद्यावर या हॉस्पिटलचा पदभार सोपविण्यात आला आहे.
कोविडच्या काळात ठाणे महापालिकेने उभारलेल्या ग्लोबल हॉस्पिटलचा कारभार सुरुवातीपासून वादग्रस्त राहिला आहे. डॉ. माळगावकर यांना एकट्याने हॉस्पिटलचा कारभार करणे शक्य नसल्याने उपायुक्त केळकर यांना पूर्णवेळ ग्लोबल हॉस्पिटलचा कारभार सोपवला होता. त्यामुळे डॉ. माळगावकर आणि डॉ. केळकर ग्लोबलचा कारभार सांभाळत होते. रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी पैसे मागण्याचे तसेच रुग्णांच्या सामानाची चोरी होण्याचे काही प्रकारदेखील या रुग्णालयात झाले होते. त्यानंतर डॉ. केळकर यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कडक धोरण अवलंबले होते. त्यामुळे काही प्रमाणात कर्मचाऱ्यांमध्ये वचक होता. काही दिवसांपूर्वी सेलिब्रेटीला बेकायदा लस देण्याचे प्रकरण उजेडात आले होते. लस घेणाऱ्यांमध्ये दोन अभिनेत्रींचादेखील समावेश होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केळकर यांच्या अध्यक्षतेखालीच चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल केळकर यांनी ५ ते ६ दिवसांपूर्वीच सादर केला असून त्यात संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस केली होती. याच हॉस्पिटलमधील एका महिला कर्मचाऱ्याने केळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
केळकर यांची बदली सोमवारी केली असून, समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने कारवाई करण्याआधीच अचानक बदली का केली, असा प्रश्न आता पालिका वर्तुळात विचारला जात आहे. केळकर यांची तडकाफडकी बदली करून कोणाला पाठीशी घातले जाते आहे, असा प्रश्न खासगीमध्ये विचारला जात आहे. केळकर यांना अजून नवी जबाबदारी देण्यात आलेली नाही. वरिष्ठ पातळीवर याबाबत काय भूमिका घेण्यात येणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सहा दिवसांनंतरही कारवाई का नाही?
सेलिब्रेटींना बेकायदा लस दिल्याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल देऊन सहा दिवस उलटून गेले आहेत. यामध्ये सर्व प्रकारची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अजूनही संबंधितांवर कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासन कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. कारवाई करणे तर लांबच राहिले; मात्र आता केळकर यांचीच बदली झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेविषयी साशंकता निर्माण होऊ लागली आहे.
...............
डॉ. केळकर यांची प्रशासकीय सोयीसाठी बदली करण्यात आली आहे. त्यांना दुसरी जबाबदारी देण्यात येईल. डॉ. माळगावकर यांच्यावर पूर्णवेळ कारभार सोपवण्यात आला असून त्यामुळे निर्णयप्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
- संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, ठामपा
................
वरिष्ठांचा निर्णय मला मान्य आहे. यापेक्षाही चांगली जबाबदारी कदाचित माझ्यावर सोपवण्यात येणार असेल. त्यामुळे या निर्णयाचे मी स्वागत करतो.
- डॉ. विश्वनाथ केळकर, उपायुक्त, ठामपा