भिवंडी: कार्यालयीन कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा असल्याने सोमवार ते शुक्रवार सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६.१५ ही वेळ असतांना मनपा कार्यालयामध्ये उशिरा येणारे व कामाच्या वेळेपूर्वी जाणारे मनपा कर्मचारी बेजबाबदारपणे वर्तन करीत असल्याबाबतची बातमी दैनिक लोकमत मध्ये गुरुवारी प्रसिद्ध झाली.या बातमीची भिवंडी मनपा मुख्यालय उपयुक्त दीपक झिंजाड यांनी दखल घेत आयाराम गयाराम यांच्यावर कारवाई करण्यासाठी गुरुवारी महानगरपालिकेच्या मुख्यालयातील काही विभागांमध्ये अचानक भेट दिल्या.या भेटी दरम्यान ९ गैरहजर कर्मचारी व कामाच्या वेळेपूर्वी लवकर गेलेले कर्मचारी ४ असे एकूण १३ कर्मचारी उपयुक्तांच्या भेटीत सापडल्याने त्यांच्यावर कारवाई होणार आहे.यामुळे कर्मचा-यांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे.
लेट लतीफ व पळकुट्या मानसिकतेवर अंकुश आणण्यासाठी आता लवकरच बायोमेट्रीक प्रणाली जी पे रोलला कनेक्टेड असणार आहे अशा प्रणालीचा वापर करण्यांत येणार असून, त्याव्दारे पगार दिला जाणार असल्याची माहिती उप-आयुक्त झिंजाड यांनी दिली असून आता दररोज सकाळी आणि सायंकाळी कामावर येण्या-जाण्याच्या वेळेवर तपासणीकामी भरारी पथकाची नियुक्ती करणार असल्याचेही झिंजाड यांनी सांगितले त्यामुळे अशा कर्मचा-यांवर निर्बंध आणणे किंवा कारवाई करणे निश्चितच सोपे होईल आणि सर्व विभागांना नियमानुसार करमचा-यांसाठी कर्मचा-यांचे कामानिमित्त येण्या- जाण्यासाठीचे आगमन-निर्गमन रजिस्टरही ठेवण्याचे निर्देश दिलेले असल्याने बेजवाबदार कर्मचा-याची नक्कीच कोंडी होणार आहे त्यासाठी मनपा प्रशासन ऍक्शन मोडवर आली आहे. उपायुक्तांच्या या अचानक भेटीमुळे आयराम गयारामांमध्ये धडकी भरली आहे.
कार्यालयीन कामकाजाच्या वेळेप्रमाणे कर्मचा-यांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये आपआपली कर्तव्य आणि जबाबदारी व्यवस्थितरित्या पाळून कार्यालयीन शिस्त लावण्याच्या उद्देशाने ही अचानक भेट दिली असल्याची प्रतिक्रिया मुख्यालय उपायुक्त दीपक झिंजाड यांनी दिली आहे.