- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका उपयुक्तांना सोपविलेल्या विभागात आयुक्तांनी भेदभाव केल्याचा आरोप उपमहापौर भगवान भालेराव यांनी करून उपायुक्त अशोक नाईकवाडे व प्रियंका राजपूत यांच्याकडील काही विभाग काढण्याची लेखी मागणी केली. याप्रकारने महापालिकेत आयुक्त विरुद्ध उपमहापौर असा सामना रंगल्याची चर्चा आहे.
उल्हासनगर महापालिकेला प्रथमच अतिरिक आयुक्त म्हणून करुणा जुईकर तर अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, प्रियंका राजपूत व सुभाष जाधव असे चार उपायुक्त मिळाले. उपायुक्त दर्जाचे चार अधिकारी मिळाल्याने महापालिकेत पारदर्शक व चांगले काम होणार असे वाटत होते. मात्र उपमहापौर भगवान भालेराव यांनी उपायुक्त यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विभागात आयुक्तांनी दुजाभाव करून काही उपयुक्तांना चांगले तर काहींना कमी दर्जाचे विभाग दिल्याचा आरोप केला.
उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्याकडील शिक्षण विभाग व महिला बालकल्याण विभाग तसेच उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम विभाग व भांडार विभाग काढून घेण्याची लेखी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. २९ जुलैच्या दुपार पर्यंत सोपविलेल्या विभाग काढला नाहीतर, उपमहापौर दालना बाहेर उपोषण करण्याचा इशारा भालेराव यांनी आयुक्तांना दिला आहे.
महापालिका उपयुक्त कडील सोपविलेल्या विभागावरून आयुक्त डॉ राजा दयानिधी व उपमहापौर भगवान भालेराव एकमेका विरोधात उभे ठाकल्याचे चित्र शहरात निर्माण झाले. कोरोना महामारीच्या काळात महापालिकेत कार्यरत असलेले एकमेव उपायुक्त मदन सोंडे यांनी चमकदार कामगिरी केली. मात्र त्यांना बाजूला सारून कमी महत्त्वाचे विभाग दिल्याचा आरोप भालेराव यांनी केला.
तसेच विभाग सोपविताना वरिष्ठ श्रेणीचा विचार केला नाही. असेही ते म्हणाले. तसेच आयुक्त डॉ राजा दयानिधी हे बहुतांश नगरसेवक, पत्रकार, नागरिक, पालिका अधिकारी यांना भेटत नसल्याने, त्यांच्या विरोधात शहरात रोष निर्माण झाल्याचा आरोपही उपमहापौर भगवान भालेराव यांनी केला. उपमहापौरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने व आरोपाने महापालिकेतील वातावरण ढवळून निघाले आहे.
हे तर प्रशासकीय कामकाज - आयुक्त डॉ. दयानिधीमहापालिका सेवेत दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना विविध विभागाचा पदभार सोपविणे, हे प्रशासकीय नियमित काम आहे. उपमहापौर भगवान भालेराव यांचे उपोषण व उपयुक्तांकडे सोपविलेल्या बाबतचे पत्र मिळाले असून नियमानुसार काय कारवाई होते. त्यानुसार कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.