लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्यावर विविध आरोप करून उपोषणाला बसलेल्या उपमहापौर भगवान भालेराव यांनी आयुक्तांच्या आश्वासनाविना उपोषण मागे घेतले. दुसरीकडे उपोषणाचे कारण देऊन सामान्य नागरिकांना महापालिका मुख्यालयात प्रवेश न दिल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली. दरम्यान, आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतरच उपोषण मागे घेतल्याचा दावा उपमहापौरांनी केला.
उल्हासनगर महापालिकेला प्रथमच अतिरिक्त आयुक्त म्हणून करुणा जुईकर, तर अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, प्रकाश जाधव व प्रियांका जाधव असे चार उपायुक्त मिळाले. महापालिकेचा कारभार जलद, चांगला व पारदर्शक होण्यासाठी आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी विभागांचे वाटप उपयुक्तांत केले. मात्र, उपमहापौरांनी विभागाचे वाटप सेवा ज्येष्ठतेनुसार झाले नसल्याचा आक्षेप नाेंदवून काही उपायुक्तांवर अन्याय झाल्याचा आरोप केला. तसेच महापालिकेत भोंगळ कारभार, कोविड रुग्णालयासाठी खरेदी केलेल्या साहित्य खरेदीत भष्टाचार, असे आरोप करून उपोषण केले.
महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या दालनासमोर शुक्रवारी सकाळी उपमहापौर भगवान भालेराव यांच्यासह काही नगरसेवकांनी उपोषण सुरू केले. यादरम्यान नगरसेवक, पत्रकार, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतरांना महापालिका मुख्यालय प्रवेश देण्यास बंदी घातली. त्यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय झाली. आमदार कुमार आयलानी, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी आयुक्तांसोबत चर्चा केली. त्यानंतर भगवान भालेराव, प्रमोद टाले यांनी आयुक्तांशी चर्चा करून उपोषण मागे घेतले. आयुक्तांनी कोणतेही आश्वासन न देता नियमानुसार काम करणार असल्याचे स्पष्ट केले.