ठाणे : लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रालोआच्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना सोबत घेऊन शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे तेथे गेल्याने ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. उपमुख्यमंत्रीपदी स्वत: निवडून येणाऱ्या व इतरांना निवडून आणणाºया नेत्याची नियुक्ती केली जाणार की, केवळ ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर निवड केली जाणार, अशी कुजबुज सुरू झाली आहे.
राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी झाली, तरी शिवसेनेला सत्तेचा समाधानकारक वाटा मिळाला नाही. लोकसभेच्या काही एक्झिट पोलनुसार शिवसेनेच्या जागा १८ वरून १७ इतक्याच कमी होणार आहेत. भाजपला किमान सहा जागांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या काही नेत्यांच्या दाव्यानुसार, शिवसेनेमुळे लोकसभेला रालोआला फटका बसण्याची चिन्हे आहेत. अर्थात, निकाल काहीही लागले, तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अटळ असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही बडे नेते शिवसेना, भाजपमध्ये प्रवेश करून सत्तेत सहभागी होणार आहेत. त्याचवेळी उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळणार आहे. शिवसेनेने अगोदर जेव्हा विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला, तेव्हा विरोधी पक्षनेतेपद ठाणे जिल्ह्याकडे चालून आले होते. मात्र, शिवसेना सत्तेत सहभागी झाली, तेव्हा नेतेपद सुभाष देसाई यांच्याकडे सोपवले गेले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत झालेल्या रालोआच्या बैठकीला देसाई यांना पाठवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. कारण, उद्धव हे त्याच दिवशी विदेशातून मुंबईत दाखल झाले होते. खरेतर, दिल्लीतील बैठकीला केंद्रात मंत्रीपदी राहिलेले अनंत गीते, खा. संजय राऊत किंवा आनंदराव अडसूळ यांना धाडणे गरजेचे होते. मात्र, देसाई दिल्लीत जाणार, या कल्पनेने शिवसेनेतील नेते व ठाण्यातील शिवसैनिक अस्वस्थ झाले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी खुद्द उद्धव यांना उपस्थित राहण्याची विनंती केली. भाजप नेतृत्वाचा दूरध्वनी आल्याने सुखावलेल्या उद्धव यांनी पक्षांतर्गत रोष वाढू नये, याकरिता स्वत: हजर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, देसाई यांना सोबत घेऊन गेले. त्यामुळे देसाई यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याच्या शक्यतेमुळे या पदाकरिता इच्छुक नेते व समर्थक अस्वस्थ झाले आहेत.
आता जेमतेम तीन महिन्यांकरिता हे पद ज्याला दिले जाईल, त्याचाच निवडणुकीनंतर त्या पदावर दावा राहील. यदाकदाचित, भाजपची पीछेहाट होऊन शिवसेनेची सरशी झाली, तर मुख्यमंत्रीपदावर सेनेकडून दावा केला जाऊ शकतो. त्यावेळी उपमुख्यमंत्रीपद अत्यल्प कालावधीसाठी मिळालेल्या व्यक्तीचा दावा अधिक प्रबळ राहतो, असे शिवसैनिक खासगीत बोलत आहेत.