कल्याण : बहुचर्चित नव्या पत्रीपुलाचे काम मार्गी लागल्याने वाहनचालकांची वाहतूककोंडीतून सुटका झाली असताना आता नव्यानेच एक समस्या उभी राहिली आहे. या पुलावरील कल्याणच्या दिशेने जाणारा रस्ता उताराचा असल्याने त्यावरून जाताना दुचाकी घसरण्याच्या तसेच अन्य वाहनाला धडकण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत, तर दुसरीकडे लगतच्या पुलावरील डोंबिवलीकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे तसेच उंच-सखल भाग असल्याने तेथून जाताना वाहनचालकांना कसरतीचा सामना करावा लागत आहे.
नोव्हेंबर २०१८ला धोकादायक अवस्थेतील जुना पत्रीपूल पाडण्यात आला. आठ महिन्यांत नव्या पत्रीपुलाचे काम मार्गी लागेल असे दावे त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी केले होते. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे पत्रीपुलाचे काम पूर्ण व्हायला दोन वर्षांहून अधिक कालावधी लागला. दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष घातल्याने २५ जानेवारीला त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. नव्या पुलाचे आई तिसाई देवी असे नामकरणही केले असून, तो वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनचालकांची कोंडीतून मुक्तता झाली आहे. ही बाब समाधानाची असली तरी कल्याण बाजूकडील उतारावर वाहने वेगाने जात असल्याने अपघाताच्या घटना त्याठिकाणी घडू लागल्या आहेत. उताराच्या ठिकाणी गोविंदवाडी बायपास येथूनही वाहने पत्रीपूल आणि कल्याणच्या दिशेने जात असल्याने त्या चौकात सिग्नल व्यवस्था सुरू करण्याबाबतचे पत्र मनसेचे कल्याण शहर संघटक रूपेश भोईर यांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना २९ जानेवारीला दिले आहे. परंतु, अद्याप त्यांच्या पत्राला कोणतेही उत्तर प्रशासनाकडून दिले गेलेले नाही. त्यात आता दुचाकींना अपघात होण्याचे प्रकार वाढल्याने याची दखल तरी प्रशासनाकडून घेतली जाईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.
------------------------------------------------------
फोटो आनंद मोरे