सदानंद नाईकउल्हासनगर : महापौरपदाची निवडणूक पाच जुलैला होणार असून पुढील सव्वावर्षासाठी हे पद ओमी टीमला देण्याचे वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र पालिका निवडणुकीनंतर सत्ताधारी भाजपाने ओमी टीमची पर्यायाने कलानी कुटुंबाची कोंडी केली. हे पाहता मुख्यमंत्री महापौरपद ओमी टीमला देतील का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. आपला मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याचे ओमींचे म्हणणे आहे तर मुख्यमंत्रांनी सांगितल्यास आपण राजीनामा देऊ असे विधान महापौर मीना आयलानी यांनी केले आहे.उल्हासनगरचा विकास ठप्प झालेला असताना महापौरपदावरून भाजपा व ओमी टीम एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. महापालिकेवर भाजपा, ओमी टीम व साई पक्षाच्या महाआघाडीची सत्ता आल्यानंतर शहर विकास होईल असे वाटत होते. मात्र सत्तेवरून भाजपा, ओमी टीम व साई पक्षातील वाद अनेकदा चव्हाटयावर आला आहे. महापौरपदाची पहिली टर्म भाजपाला सव्वावर्षासाठी मुख्यमंत्र्यांनी दिली व नंतर सव्वावर्षे आम्हाला मिळणार असे मुख्यमंत्र्यांनी वाटून दिल्याची माहिती ओमी यांनी दिली. मीना आयलानी यांच्या महापौरपदाचा सव्वावर्षाचा कार्यकाळ पाच जुलैला संपत आहे. त्यापूर्वी आयलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा द्यावा, असे मत ओमी यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केले आहे. कोकण पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता २८ जून रोजी संपत आहे. त्यानंतर महापौरपदाच्या घडामोडीला वेग येणार असल्याचे मतही ओमी यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आम्ही अंतिम मानत असल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात ओमी टीमच्या पंचम कलानी महापौरपदी विराजमान होतील, असा आशावाद ओमी यांनी व्यक्त केला. तर महापौरपद अडीच वर्षाचे असून मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास राजीनामा देऊ असे महापौर आयलानी यांनी व्यक्त केले. महापौरपद ओमी टीमला मिळाले नाहीतर, भाजपाची सत्ता अडचणीत येण्याची शक्यता टीमच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मात्र तशी वेळ आमच्यावर येणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.लोकसभा व विधानसभेची निवडणूक पाहता महापौरपद भाजपाकडे हवे आहे. त्यामुळे अडीच वर्षे महापौरपदी मीना आयलानी कायम राहणार असून त्यानंतरचे महापौरपद ओमी टीमला देण्याची शक्यता स्थानिक भाजपा पदाधिकाºयांनी व्यक्त केली आहे. ओमी टीम महापौरपदासह येणाºया विधानसभेसाठी इच्छुक असून विधानसभेची निवडणूक कलानी कुटुंबातील व्यक्ती लढणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.
वाद महापौरपदाचा : मुख्यमंत्री वचन पाळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 1:49 AM