कल्याण : मुस्लिम, दलित, आदिवासी यांनी एकत्र यावे. सगळ्या जातीधर्मांतील गरिबांनी एकत्र यावे आणि ब्राह्मणवाद तसेच भांडवलशाहीविरोधात लढावे, अशी माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ती इच्छा आता नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे फलद्रूप व्हायला लागली आहे. सीएए, एनआरसी, एनपीआर हा केवळ मुस्लिमांचा विषय नसून, हा संपूर्ण देशातील सर्व जातीधर्मांतल्या गरिबांसाठी आणि सर्वांसाठीच चिंतेचा विषय असल्याचे मत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांनी गुरुवारी कल्याणमध्ये पत्रकारांसोबत बोलताना मांडले.संविधान बचाव समिती, कल्याणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कृष्णा टॉकीज मैदानावर जेएनयू, जामिया मिल्लिया आणि इतर विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला आणि नागरिकत्व सुधारणा कायदा, एनपीआर, एनआरसीच्या निषेधार्थ सभा झाली.संपूर्ण देशाला स्वत:च्याविरोधात उभे करुन मोदी आणि शहा यांनी देशावर उपकार केल्याची उपरोधिक टिका कोळसे पाटील यांनी यावेळी केली. ज्या देशातील विद्यार्थ्यांवर सरकार हल्ला करते, ते सरकार लायक नाही. ज्याने मोदींना विरोध केला, त्याला नेस्तनाबूत करण्यात आले आहे. मात्र, मोदी-शहांना घाबरू नका. कारण, जनशक्ती कोणत्याही ताकदीपेक्षा मोठी आहे, असे ते म्हणाले.>एनपीआरची यादी तयार करून त्याचाच एनआरसी केला जाईल, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी केला. एवढेच नाहीतर, जेएनयू प्रकरणात अजून अटकेची कारवाई झालेली नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. या घटनेच्या मागे कोण आहे, हे समोर आल्याने पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोपही सेटलवाड यांनी केला.
भांडवलशाहीविरोधात लढण्याची इच्छा फलद्रूप - बी.जी. कोळसे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 1:27 AM