मीरारोड - ऑर्केस्ट्रा बार आदींना बंदी असताना काशिमीरा भागातील एका ऑर्केस्ट्रा बारची म्हणून व्हायरल झालेली क्लिप ही इकडची नव्हे तर कर्नाटकातील बंगळुरू मधल्या बारची असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या ऑर्केस्ट्रा बारच्या नावानेच बंगळुरू येथे देखील ऑर्केस्ट्रा बार सुरू करण्यात आला आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मीरा भाईंदर महापालिका हद्दीत ऑर्केस्ट्रा बारच्या आड सर्रास अश्लील आणि अनैतिक प्रकार चालत असतात . या प्रकरणी अनेकवेळा तक्रारी आल्या नंतर पोलीस धाडी टाकतात व गुन्हे दाखल करतात . कोरोनाच्या संक्रमण काळात ऑर्केस्ट्रा बार , लॉज आदींना बंदी असली तरी काशीमीरा भागात सर्रास लॉज चालवले जायचे आणि त्यातून अनैतिक प्रकार चालायचे याच्या तक्रारी वरून थेट तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ . शिवाजी राठोड यांनी धाडी टाकायला लावल्या होत्या . आणि तक्रारीत तथ्य निघाल्याने काही लॉज चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले .
त्यातच बॉसी असे नाव असलेल्या ऑर्केस्ट्रा बारची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. त्यात बार मध्ये बारबाला चक्क मोठ्या संख्येने दिसत आहेत. काही नाचताना दिसत आहेत . ग्राहकांची सुद्धा गर्दी दिसून येत आहे . त्यात काही मोजक्याच ग्राहक - कर्मचारी ह्यांनी मास्क घातले आहेत.
बॉसी नावाचा ऑर्केस्ट्रा बार काशिमीरा पोलिस ठाणे हद्दीत असल्याने सदर बार मधील व्हायरल व्हिडीओ देखील बॉसी बारचा असल्याचा लोकांचा समज झाला. त्यातच लॉक डाऊन काळात बंदी असून देखील लॉज सुरू असल्याचे उघड झाले होते. यातूनच कोरोना संसर्गाच्या काळात बंदी असून देखील ऑर्केस्ट्रा बार बेधडक सुरू असल्याची टीका पोलिस आणि पालिकेवर झाली.
काशिमीरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले की, सदर व्हिडीओ क्लिप दुपार पासून व्हायरल झाली आहे. ती बंगळुरू येथील बॉसी बारची आहे. काशिमीरातील बॉसी बार चालवणाऱ्यां पैकी लोकांनी याच नावाने तिकडे बार सुरू केला आहे. दरम्यान क्लिप व्हायरल झाल्या मुळे पोलिसांनी काशिमीरा येथील बार मध्ये जाऊन तपासणी केली.
कर्नाटकातील बंगळुरू मधील ऑर्केस्ट्रा बार ची क्लिप व्हायरल झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्याने तेथील ऑर्केस्ट्रा बार मध्ये चालणाऱ्या ह्या प्रकारांची चर्चा रंगण्याची शक्यता आहे. कारण सदर बंदिस्त बार मध्ये सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडवण्यात आला असून बहुतेकांनी मास्क घातलेले नाहीत. शिवाय बारबाला दाटीवाटीने ठेवण्यात आल्या आहेत.