- जितेंद्र कालेकर
ठाणे: एकीकडे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यापुढे फास्टटॅगसाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे फास्टटॅग लावूनही मुंबईच्या वेशीवरील मुलूंड टोल नाका येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. तांत्रिक अडचणींमुळे फास्टटॅगच्या रांगेत वाहनचालकांचा खोळंबा होत असल्याची कबुली टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी दिली.टोलनाक्यांवर वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी सध्या केंद्र सरकारने फास्टटॅगची योजना आणली आहे. यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही वाहनधारकांनी दुर्लक्ष केले. मात्र, आता यापुढे ज्यांच्या वाहनाला फास्टटॅग नसेल त्यांना टोलनाक्यावर दुप्पटीने टोल भरावा लागणार आहे. त्यामुळेच बहुतांश वाहनधारकांनी असे फास्टटॅग बसवून घेतले आहे. फास्टटॅग असणाऱ्या वाहनांसाठी प्रत्येक टोलनाक्यावर स्वतंत्र रांगा आहेत. ठाणे आणि मुंबईच्या सीमेवरील मुलूंड चेकनाका येथेही फास्टटॅगसाठी स्वतंत्र मार्गिका आहेत. तरीही याठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा असतात. तशाच त्या मंगळवारीही होत्या. त्यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली, तर काही फास्टटॅग अजूनही कार्यरत झालेले नाहीत. काहींमध्ये रक्कम शिल्लक नसते. याशिवाय बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान रकमेपेक्षा जास्त रक्कम खात्यात असेल, तरच फास्टटॅगमधून टोलनाक्याची रक्कम काढणे शक्य असते. उदाहरणार्थ एखाद्या बँकेच्या नियमानुसार खात्यात किमान २०० रुपये असणे अनिवार्य असेल आणि त्या बँक खातेधारकाच्या कारच्या फास्टटॅगमधून टोलनाक्यावर ४० रुपये कपात करायचे असतील तर तेवढी पुरेसी रक्कम खात्यात शिल्लक असणे अनिवार्य असते. काही वाहनचालक टोलचा मासिक एमईपीचा पास आणि फास्टटॅग हे जवळजवळ लावतात. त्यामुळेही तांत्रिक समस्या उद्भवते. काही ठिकाणी फास्टटॅग चालले नाही तर मशीनद्वारे पैसे घेण्यास चालक भाग पाडतात, अशा सर्व कारणांमुळे फास्टटॅगच्या मार्गिकेमध्ये वाहनांचा खोळंबा होत असल्याचे टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जर मोठ्या प्रमाणात फास्टटॅग वापरणे सुरू झाले तर ही समस्या हळूहळू कमी होईल, असा दावाही या कर्मचाऱ्यांनी केला.
फास्टटॅग लावूनही वाहतूक कोंडीमध्ये अडकावे लागते. मग ज्यांनी फास्टटॅग लावले त्यांना हा त्रास होणे योग्य नाही. यामध्ये अधिक सुधारणा होणे आवश्यक आहे.- प्रशांत सातपुते, वाहनचालक, ठाणे
वाहनमालकाच्या बँक खात्यात कमीत कमी रक्कम शिल्लक नसेल तर फास्टटॅग असूनही संबंधित मोटार ही ब्लॅक लिस्टमध्ये जाते. बरेचदा फास्टटॅग रिचार्ज केलेले नसेल अशावेळीही रोख रक्कम घेण्यात वेळ जातो. त्यामुळे दहा ते १५ सेकंदांमध्ये टोलनाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा होतो. अशावेळी मागून आलेल्या वाहनधारकांकडे योग्य रिचार्ज असलेले फास्टटॅग असूनही वाहतूक कोंडीमध्ये वाहन अडकण्याची वेळ येते.- जयवंत दिघे, व्यवस्थापक, एमइपी, टोलनाका, मुलुंड
सुरुवातीच्या काळात ही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त वाहनधारकांनी जर फास्टटॅग लावले तर ही समस्या हळूहळू कमी होईल. ज्या टोलनाक्यांवर फास्टटॅगच्या अडचणींमुळे वाहतूक कोंडी होईल, तिथे अतिरिक्त पोलीस कर्मचारी नेमले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल.- बाळासाहेब पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त, ठाणे शहर