सुरेश लोखंडेठाणे : बारवीच्या पात्रातील गावपाड्यांच्या रहिवाशांना न जुमानता यंदाच्या पावसाळ्यात बारवीमध्ये १०० टक्के वाढीव पाण्यासाठी तयार करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी बेहत्तर, परंतु बारवीची उंची वाढवून जादा पाणीसाठा तयार करण्यासाठी एमआयडीसी यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे.
शहरांची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी एमआयडीसीचे बारवी धरण हे एकमेव उपयुक्त ठरत आहे. पाण्याची गरज लक्षात घेऊन या बारवीची उंची वाढण्यासाठी प्रशासनाने मागील काही वर्षांपासून तयारी दाखवलेली आहे. पण, उंची वाढवून पाणीसाठा केल्यास या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आदिवासीपाड्यांना जलसमाधी मिळणार आहे. यामुळे या गावपाड्यांतील ग्रामस्थांनीही धरणाची उंची वाढवण्यास विरोध केला आहे. त्यांचे सुयोग्य पुनर्वसन करण्याची मागणी आहे. त्यांच्या या मागणीस अनुसरून प्रशासनाने पुनर्वसनाचीदेखील तयारी निश्चित केली आहे. पण, ग्रामस्थांचा विरोध कमी होण्यास विलंब झाल्यामुळे बारवीची उंची वाढवण्याचे काम रखडले आहे. पण, शहरांमधील वाढत्या लोकसंख्येस अनुसरून लोकप्रतिनिधींकडून वाढीव पाण्याची मागणी होत आहे. यामुळे यंदा बारवीची उंची वाढवून १०० टक्के पाणीसाठा करण्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एमआयडीसी, लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्यातील महापालिका आयुक्तांमध्ये एकमत झाले. या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहाच्या बैठकीत शुक्रवारी चर्चा होऊन सर्वांनी सहमती दर्शवली. ग्रामस्थांनी विरोध दर्शवला तरी बारवीची उंची वाढवून यंदाच्या पावसाळ्यात १०० टक्के पाणीसाठा करण्यावर एकमत झाले आहे. यासाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी बेहत्तर. पोलीस त्यांचे काम करतील, पण धरणाची उंची वाढवून यंदा वाढीव पाणीसाठा करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला.
या वाढीव पाणीसाठ्यामुळे धरणाच्या पाणलोटात बाधित गावकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या यादीचीदेखील पालकमंत्र्यांनी विचारणा केली. एक हजार १०० पेक्षा जास्त बाधित गावकºयांची यादी असल्याचे प्रशासनाकडून निदर्शनात आणून देण्यात आले. धरणाच्या पाणलोटातील बाधित लोक आडमुठेपणा करायच्या तयारीत असले, तरी काही एक ऐकून न घेता त्यांचे नियोजित ठिकाणी पुनर्वसन करा. महापालिकांनी ठराव घेतले आहे. आयुक्तांचा होकार, एमआयडीसीची सहमती आहे. आता सर्वांची संमती आणि होकार मिळाल्यामुळे बारवीची उंची वाढवून हा विषय एकदाचा निकाली काढण्यास पालकमंत्र्यांनी प्रशासनास आदेश दिले आहे.
बारवी धरणात उरला ४६ दिवसांपुरताच पाणीसाठा : यंदाच्या पावसाळ्यात पाणीसाठा होऊनही तीन टक्के तूट निर्माण झाली होती. ती भरून काढण्यासाठी आठवड्यातून ३० तासांची पाणीकपात सुरू केली आहे. उत्हासनगर शहरात २४ तासांची म्हणजे महिन्यातून चार दिवस आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी कपात लागू आहे. पावसाळा जवळ आल्यामुळे या कपातीतून सुटका मिळावी, जादा पाणी द्यावे, यासाठी आमदार ज्योती कलानी यांनी मागणी लागू केली. पण, बारवीत केवळ ४६ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. १५ जुलैपर्यंत ते पुरवायचे असल्यामुळे कपात रद्दही होणार नाही आणि वाढीव पाणीही मिळणार नसल्याचे प्रशासनाकडून या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यावर संतापून बारवीची उंची वाढवण्याचा विषय एकदाचा मिटवून टाका आणि यंदा वाढीव पाणीसाठा करण्याचे आदेशच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासनास देण्यात आले आहेत.