शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालक स्थानिक यंत्रणेच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहताना दिसत आहेत. पालिका प्रशासन केवळ थातूरमातूर डागडुजी करून रस्त्यांची कामे सुरू असल्याचा कांगावा करते. मात्र तात्पुरते डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवरून अवजड वाहने गेल्याने या रस्त्यांची पुन्हा दुरवस्था होते. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास होत असून, धुळीचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांकडून पालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.भिवंडीत तर ही परिस्थिती जास्तच भीषण आहे. शहरातील रस्त्यांप्रमाणेच भिवंडीतील उड्डाणपुलांचीही अक्षरश: दैना झाली आहे. भिवंडीतील अंजूरफाटा, वंजारपट्टीनाका रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी कोट्यवधींचे काम एमएमआरडीए प्रशासनाकडून मंजूर करण्यात आले आहे. कंत्राटदारामार्फत या रस्त्याचे कामही सुरू आहे. मात्र या रस्त्याच्या कामाचे कोणतेही नियोजन नसल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. याच मार्गावर असलेल्या धामणकरनाका येथील उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे धूळ उडत असल्याने दुचाकीस्वारांना प्रचंड त्रास होत आहे. या उड्डाणपुलाच्या देखभालीकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने स्थानिकांसह प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. धामणकरनाका उड्डाणपुलाप्रमाणेच कल्याणनाका येथे असलेल्या उड्डाणपुलाचीही खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे रस्त्यांच्या दुरवस्थेवर तातडीने उपाययोजना करण्यात येणार असून, खड्डे लवकरात लवकर दुरु स्त करण्यात येतील. शहरात १५ रस्त्यांची कामे सुरू होणार असून त्यासाठी योग्य नियोजन व उपाययोजनाही करण्यात येतील, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.स्मार्ट सिटीसोबतच शहरातून मेट्रो धावण्याची स्वप्ने राज्यकर्ते दाखवत असले, तरी प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण झाली असून, पावसाळा उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळ्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल, असे बोलून सर्वच यंत्रणा हात झटकत होत्या. आता पावसाळा उलटल्यानंतर जिल्ह्यातील रस्त्यांची नेमकी काय स्थिती आहे, याचा आढावा घेतला आहे, ‘लोकमत’चे प्रतिनिधी पंकज पाटील, सदानंद नाईक, नितीन पंडितआणि जनार्दन भेरे यांनी.अधिकारीही करतात धुळीतून प्रवास : धुळीमुळे नागरिकांना घशाचे व श्वसनाचे आजार होत आहेत. मात्र शहरात पालिका प्रशासन व ग्रामीण भागात सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. धामणकरनाका ते वंजारपट्टीनाका या रस्त्यावर खड्डे व धुळीचे साम्राज्य इतके पसरले आहे की, दुचाकीस्वारांना प्रवास करताना अक्षरश: नको होत आहे. याच मार्गावर भिवंडी पालिकेचे कार्यालय असून, सर्वच अधिकारी व कर्मचारी धुळीच्या रस्त्यावरून रोजचा प्रवास करत असतानाही त्यात सुधारणा झालेली नाही.
पावसाळा उलटूनही जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:28 PM