मीरारोड - भाईंदर पश्चिम परिसरात गुन्हे दाखल होऊन सुद्धा भरणी माफियांचा राजरोसपणे कांदळवन क्षेत्रात बेकायदा भराव सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वरदहस्त शिवाय भरणी माफिया इतके धाडस कसे दाखवतील? असा प्रश्न तक्रारदार यांनी उपस्थित केला आहे.
भाईंदर पश्चिमेच्या दर्शना हाईट्स - प्लॅनेटेरिया कॉम्प्लेक्स मागील भागात असलेल्या खाडी, सीआरझेड व कांदळवन परिसरावर गेल्या काही वर्षां पासून जागामालक व भरणी माफियांची संक्रात ओढवली आहे . या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरणी माफियांच्या संगनमताने जागा मालकांनी मोठ्या प्रमाणात खाडी , सीआरझेड व कांदळवन क्षेत्रात बेकायदेशीर भराव करून पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास चालवला आहे. खाडी किनारा परिसर संरक्षित असताना या भागात होणाऱ्या वारेमाप भरावा मुळे शहरात पाणी तुंबण्याचे प्रमाण सुद्धा वाढू लागले आहे.
या भागातील कांदळवन नष्ट करून भराव प्रकरणी कोकण विभागीय कांदळवन उपसमिती पासून स्थानिक कांदळवन समिती ने अनेकवेळा स्थळ पाहणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींवरून भाईंदर पोलीस ठाण्यात गेल्या काही वर्षात अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत . परंतु जमीन मालक - विकासक , भरणी माफिया आदींशी असलेल्या साट्यालोट्या मुळे भरणी माफिया मुजोर झाले असून त्यांना कारवाईची भीती राहिलेली नाही असेच सातत्याने चालणाऱ्या भरावा वरून दिसत आहे . गुन्हे दाखल होऊन सुद्धा पोलिसांनी वाहने जप्त करण्यासह संबंधितांना अटक करून प्रतिबंधात्मक कारवाईस टाळाटाळ चालवल्याचा आरोप होत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कांदळवन व कांदळवन पासूनच ५० मीटर बफर झोन संरक्षित करून कांदळवनाची तोड, भराव व बांधकामास मनाई केली आहे . कांदळवन नष्ट केले गेले तेथील भराव - बांधकामे काढून पुन्हा कांदळवन लागवड चे आदेश न्यायालयाने दिले आहेत . तसे असताना गुन्हे दाखल होऊन सुद्धा राजरोसपणे खाडी व कांदळवन क्षेत्रात चालणारा भराव गंभीर बाब असून या प्रकरणी संबंधित पोलीस आदी अधिकाऱ्यांवर कारवाईची तसेच आधी दाखल गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखे मार्फत करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली आहे.