-जितेंद्र कालेकरठाणे : पर्यटनासाठी ठाण्यातून नेपाळ येथे गेलेले त्रिपाठी कुटुंबीय विमान दुर्घटनेमध्ये बेपत्ता झाले. अशोक त्रिपाठी हे पत्नी वैभवीसोबत विभक्त झाले होते. विभक्त झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून त्यांना मुलांसाठी वर्षातून दहा दिवस एकत्र फिरण्याची मुभा मिळाली होती. त्यानुसार यंदाच्या वर्षी ते नेपाळला फिरण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान विमानाला अपघात झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. कापूरबावडी पोलिसांनीही यास दुजोरा दिला.
ठाण्याच्या माजीवडा परिसरातील रुस्तमजी अथेना या गृहसंकुलात राहणारे त्रिपाठी कुटुंब हे फिरण्यासाठी नेपाळ येथे गेले होते. त्याचदरम्यान २९ मे रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत हे संपूर्ण कुटुंबच बेपत्ता झाले. या कुटुंबामध्ये अशोक त्रिपाठी त्यांची पत्नी वैभवी बांदेकर त्रिपाठी, मुलगा धनुष्य त्रिपाठी आणि मुलगी रिती त्रिपाठी या चाैघांचा समावेश आहे. या कुटुंबीयांसदर्भात आता वेगळीच माहिती समोर आली आहे.
अशोक आणि त्यांची पत्नी वैभवी हे दोघेही विभक्त झाले होते. त्यामुळेच मागील काही वर्षांपासून ते दोघे वेगळे वास्तव्य करीत होते.वैभवी या मुलांसह ठाण्यात वास्तव्याला होत्या. तर अशोक त्रिपाठी हे भुवनेश्वर येथे वास्तव्याला होते. न्यायालयाने त्रिपाठी परिवाराला मुलांना आई-वडील मिळावेत, तसेच त्यांच्यात समझोता होण्याच्या दृष्टीने वर्षातून दहा दिवस एकत्रित राहण्याची मुभा दिली होती.