डोंबिवली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तारांकित प्रश्नाची दखल घेत डोंबिवली पश्चिमेकडे गरिबाचा वाडा येथील शाळेच्या आरक्षित भूखंडावर बेकायदा बांधकामावर मंगळवारी महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाई केली; पण या प्रकरणी झालेल्या बांधकामाला केवळ ड्रिलने भोके पाडून अर्धवट कारवाई करून कार्यवाही थांबवू नका अशा मागणीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये गुरुवारी प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तातडीने बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त करण्याचे आदेश प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांना दिले आहेत.
पवार यांनी ही माहिती दिली असून, पुढील आठवड्यात मंगळवारी पुन्हा ते बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्तांनी गुरुवारी पाहणी केली आणि महापालिकेने नुकत्याच घेतलेक्या हाय रिप जॉ क्रशर या क्रेन यंत्रणेद्वारे ते तोडकाम करण्याचे नियोजन असल्याचे पवार म्हणाले. त्यावेळी पोलीस बंदोबस्त मिळावा याबाबतही पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. केवळ तोंडदेखली कारवाई करून काही उपयोग नसल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी म्हटले आहे. याबाबत फडणवीस यांना ईमेल पाठवून जी कार्यवाही झाली त्याचे छायाचित्र आणि ते जमीनदोस्त करण्याची दखल घ्यावी, असे स्पष्ट म्हटल्याचे सांगण्यात आले.