मुरबाड : शासनाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले कोट्यवधींचे धान्य बेवारस पडलेले असून त्याची नासाडी हाेत असल्याचे चित्र दिसत आहे. हे आयते कुरण मिळाल्याने भटक्या प्राण्यांनी या धान्य गाेदामाचा ताबा घेतल्याने तालुक्यातील खरेदी-विक्री संघाच्या कारभाराचे सर्वत्र धिंडवडे निघत आहेत. या नासाडीबाबत ‘लाेकमत’ने लक्ष वेधूनही त्याकडे खरेदी-विक्री संघाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शासनाने मुरबाड तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सुमारे तीन हजार ८८४ शेतकऱ्यांचे ९३ हजार ४२४ क्विंटल धान्य खरेदी केले. त्यापैकी शेकडो शेतकऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे़. हे शेतकरी दररोज खरेदी-विक्री संघाकडे फेऱ्या मारत आहेत. खरेदी केलेले धान्य राईस मिलमध्ये भरडून त्यातून मिळणारा तांदूळ रास्त भाव दुकानाला पुरविला जातो. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धान्याची निगा राखण्यासाठी लागणारी साधनसामग्री व मनुष्यबळ संघाला पुरवले जाते. मुरबाड तालुक्यातील शेतकरी संघाने खरेदी कलेल्या या धान्याची याेग्य काळजी घेतली जात नसल्याने नासाडी हाेत आहे. यासाठी दरमहा लाखाे रुपयांचे गाेदाम भाडे भरले जात आहे. मात्र, या गाेदामाला दरवाजे नसल्यामुळे भटक्या जनावरांनी त्याचा ताबा घेतला आहे, तर उर्वरित धान्य हे उघड्यावर टाकून त्यावर प्लास्टिक टाकले आहे. मात्र, अतिवृष्टीच्या काळात हे हजारो क्विंटल धान्य भिजून सडले आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून गरिबांची पोटाची खळगी भरण्यासाठी साठवलेल्या धान्याच्या प्रकरणी शेतकरी संघावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिक करत आहेत.