ठाणे : दोन हजार कोटी रुपयांच्या बिटकॉइन घोटाळ्यामुळे चर्चेत आलेला आरोपी अमित भारद्वाजचा ठाणे पोलिसांनी सोमवारी पुणे पोलिसांकडून ताबा घेतला. कल्याण येथील खडकपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध गेल्या आठवड्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.अमित भारद्वाजच्या गेन बिटकॉइन कंपनीमध्ये कल्याण येथील रघुवीर कुळकर्णी यांनी गतवर्षी २२ लाख ५0 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. या कंपनीने गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले होते. आमिषास बळी पडून कुळकर्णी यांनी या आभासी चलनामध्ये गुंतवणूक केली. मात्र, त्यांची संपूर्ण रक्कम बुडाली. कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.रघुवीर कुळकर्णी यांच्याप्रमाणे कल्याणमधील अनेक गुंतवणूकदारांना ‘गेन बिटकॉइन’ने गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे. या कंपनीविरूद्ध पुण्यातही एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. एप्रिल महिन्यात या प्रकरणी ‘गेन बिटकॉइन’चा मालक अमित भारद्वाजला दिल्लीतून अटक केली होती. तो आतापर्यंत पुणे पोलिसांच्या ताब्यात होता. सोमवारी खडकपाडा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये ठाणे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. त्याला मंगळवारी कल्याण न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. खडकपाडा येथील गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेला अमित भारद्वाज हा पहिला आरोपी आहे. आभासी चलन घोटाळ्यामध्ये अमित भारद्वाज याची वेगवेगळ्या यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. आठ हजार गुंतवणूकदारांना जवळपास दोन हजार कोटी रुपयांनी फसविल्याच्या एका प्रकरणामध्ये त्याची चौकशी सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू आहे. सक्तवसुली संचालनालयाने दहा दिवसांपूर्वी याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांचीही चौकशी केली होती.
बिटकॉइन घोटाळ्यातील आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 5:32 AM