पंकज पाटील, अंबरनाथ:अंबरनाथ पश्चिमेकडील काही भागात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईसंदर्भात मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन पाणी कार्यालयाकडून देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरु असलेले साखळी उपोषण आज माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थितीमध्ये मागे घेण्यात आले. यावेळी आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करीत राजकारणासाठी पाण्याचा वापर केला जात असल्याचा आरोप केला.
अंबरनाथ पश्चिम भागातील संघटन चौक, बुवापाडा,भास्करनगर आदी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ शुक्रवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. अखेर उपोषणाच्या आजच्या पाचव्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या उपोषणास भेट देत उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे घेतले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांनी उपोषणकर्ते यांच्या २० पैकी १८ मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासनाचे पत्र आव्हाड यांच्या उपस्थितीत उपोषणकर्ते यांना देत उपोषण मागे घेतले. तर आव्हाड यांनी संबधित अधिकाऱ्यांना एक महिन्यांची मुदत देत दिलेल्या आश्वासनानुसार पाण्याचा पुरवठा न झाल्यास परत पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला. तर अंबरनाथ शहरात निवडणुका जवळ आल्यावरच राजकीय हेतूसाठी पाणी रोखण्याचं काम सुरू होते. राजकारण करण्यासाठी पाण्याचा वापर होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला