लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर, मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक व विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असून, ठाकरे सरकारच्या शिक्षणविरोधी धोरणांमुळे शिक्षण क्षेत्राची अधोगती होत आहे, असा आरोप कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला.
भाजपच्या कल्याण जिल्हा शिक्षक आघाडीने शिक्षण क्षेत्रातील मागण्यांसाठी बुधवारी कल्याण तहसील कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते. शिक्षकांना वेळेवर १ तारखेला वेतन मिळावे, वरिष्ठ व निवडश्रेणी शिक्षकांचे प्रशिक्षण तातडीने आयोजित करणे, पीएफ, मेडिकल बिले त्वरित मंजूर करावीत, शिक्षण सेवकांची सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढ करावी, जुनी पेंशन योजना सुरू करा, शिक्षक शिक्षकेत्तरांना त्रिस्तरीय १०-२०-३० ची योजना लागू करा, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके त्वरित द्यावीत, ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, शिक्षक भरती सुरू करावी, ठाणे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवावा, संस्थाचालकांना आरटीई प्रतिपूर्ती वेळेवर द्यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन कल्याण तहसीलदार व कल्याण शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आले.
त्या वेळी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, सहसंयोजक विकास पाटील, कोकण विभाग संयोजक एन. एम. भामरे, कार्यवाह विनोद शेलकर व कल्याण जिल्हा अध्यक्ष सुभाष सरोदे, ज्ञानेश्वर घुगे, अनिरुद्ध चव्हाण, शरद शिंदे व इतर शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------------