ठाणे - ठाणे परिवहनचा गाडा पुन्हा रुळांंवरून खाली उतरल्याने तिला पुन्हा स्थिरस्थावर करण्यासाठी परिवहन समितीने २०० बसची मागणी महापौरांकडे केली आहे. तसेच परिवहनला सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. या संदर्भात गुरुवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात एक बैठक झाली. या बैठकीत ठाणेकरांच्या सोयीसाठी गेली अनेक वर्षे परिवहन सेवा कार्यरत आहे. ही सेवा अधिक सक्षमतेने नागरिकांना उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले. परिवहन सेवा ही मुख्य रस्त्यापर्यंत मर्यादित न ठेवता ती शहरातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील धावली पाहिजे, या दृष्टीने नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली.या बैठकीला उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, परिवहन समिती सभापती विलास जोशी, राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, परिवहन समितीचे सर्व सदस्य, परिवहन उपायुक्त संदीप माळवी व इतर अधिकारीदेखील उपस्थित होते. यापूर्वीच पालकमंत्री एकनाथ शिंदे व महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांना १०० इलेक्ट्रिक बस ठाणेे महापालिकेला द्याव्यात, या मागणीचे निवेदन दिले असल्याचे सांगून या संदर्भात पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे महापौर यांनी यावेळी नमूद केले.
उत्पन्नवाढीच्या दृष्टीने नियोजन गरजेचेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सात ते आठ महिने परिवहन सेवा ठप्प होती. याचा आर्थिक फटका बसत आहे. परिवहन सेवा सक्षम करताना उत्पन्नाच्या वाढीच्या दृष्टीनेदेखील योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही वर्षांमध्ये ठाण्याचे नागरिकीकरण झपाट्याने वाढत असून मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. केवळ मुख्य रस्त्यांबरोबरच शहरातील अंतर्गत रस्तयांवर बससेवा उपलब्ध होईल, या दृष्टीने सर्व मार्गांचे फेरीनियोजन वा फेररचना करणे आवश्यक आहे. छोट्या रस्त्यांवर सेवा देण्यासाठी लहान बस परिवहनच्या ताफ्यात घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.