कल्याण : राजमाची डोंगरावरून वाहणारी आणि कर्जत, बदलापूर, अंबरनाथ आणि कल्याणमार्गे समुद्रास मिळणारी उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. अतिक्रमण, सांडपाणी, कारखान्यांतले रसायन व घरगुती टाकाऊ वस्तू यामुळे उल्हास नदीला काही ठिकाणी नाल्याचे स्वरूप आले आहे. या नदीची स्वच्छता आणि सुंदरता अबाधित राहावी आणि प्रदूषण थांबावे या भावनेतून उल्हास नदी बचाव कृती समिती आणि वालधुनी बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी राबविलेल्या उपक्रमात रंगीबेरंगी अकरा साड्या (उमाई) उल्हास नदीला ओटी स्वरूपात अर्पण करून नदी प्रदूषित न करण्याचा निर्धार केला गेला.
या अर्पण केलेल्या साड्या याच नदीच्या बाजूला राहणाऱ्या गरजू महिलांना भेट म्हणून देण्यात आल्या. रायते ब्रीज पांजरापोळ या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमाला कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी व त्यांच्या पत्नी सीमा, तसेच कांबाच्या सरपंच भारती भगत, वरप ग्रामपंचायत सदस्या संगीता भोईर, म्हारळ ग्रामपंचायत सदस्या वेदिका गंभीरराव, उल्हास नदी बचाव कृती समितीचे अश्विन भोईर यांसह अन्य सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------------------------------------