प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी मॉडेला चेक नाका, गोपाल आश्रम हॉटेलच्या बाजूला, वागळे इस्टेट, ठाणे येथे होत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेसाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ७४ ठिकाणे केंद्र शासनाने निर्धारित केली आहेत.
विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत दर दिवशी दोन ठिकाणी कॅम्प नियोजित असणार आहेत. शहरी भागाकरिता असलेल्या योजनांपैकी महापालिकेशी संलग्न पीएम स्वनिधी, स्वच्छ भारत मिशन, पीएम ई-बस सेवा, अमॄत (पाणीपुरवठा व मलनिस्सारण), पंतप्रधान आवास योजना (PMAY) या योजनेबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलची उभारणी, आरोग्य शिबीर, क्षयरोग तपासणी व औषधोपचार शिबीर असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ही विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाली आहे. ती २४ जानेवारी २०२४ पर्यंत विविध ठिकाणी सुरू राहणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या ४ डिजिटल स्क्रीन असलेल्या व्हॅन सज्ज करण्यात आल्या आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ७४ ठिकाणी या व्हॅन जातील. या माध्यमातून विविध शासकीय योजनांची प्रसिद्धी केली जाणार असून गरजू लाभार्थ्यांचा शोध घेणे, त्यांना प्रत्यक्ष योजनांची माहिती देणे, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे उपक्रम अगदी तळागाळापर्यंत राबविले जाणार आहेत. त्या दृष्टीने केंद्र शासनाच्या नीती आयोगाच्या संचालक जागृती सिंगला, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे