मुंबई : पनवेलमधील नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्ल्यूयंस नोटीफाईट एरिया (नैना) येथे उभारण्यात आलेल्या परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पातून म्हाडाला १ हजार घरे मिळणार आहेत. अशा प्रकारे इतर विकासकांनीही पुढाकार घेऊन परवडणारी घरे उभारल्यास २०२२ सालापर्यंत नक्कीच मुंबई महानगर क्षेत्रात १० लाख परवडणारी घरे उभारता येतील, असा विश्वास गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या अद्ययावत गृहसंकुलाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या गृहसंकुलाप्रमाणेच इतर विकासकांनीही परवडणाºया घरांची उभारणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.गुरुवारच्या उद्घाटनानंतर शुक्रवारी याच विषयावर नरिमन पॉइंट येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती विकासक विजय वाधवा यांनी दिली. तूर्तास तरी या प्रकल्पामुळे या पट्ट्यात आणखी विकासक प्रकल्प राबवतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, परवडणाºया घरांच्या नावावर घरांचा आकार कमी करून किमती कमी करण्याचा प्रकार सुरू असल्याची खंत वाधवा यांनी व्यक्त केली. लोकांच्या कनेक्टिव्हिटीचा विचार विकासकांकडून दुर्लक्षित केला जात आहे.याउलट ग्राहकांच्या माथी घरे मारण्यासाठी घर खरेदीवर दागिने, गाडी, एसी, फर्निचर मोफत देण्याची प्रलोभने विकासकांकडून दाखवली जात आहेत. तर काही विकासक तरणतलाव, व्यायामशाळा अशा वास्तू दाखवून घरखरेदी करणाºयांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे परवडणारी घरे उभारताना या दुय्यम सुविधा देण्याऐवजी आकाराने मोठ्या घरांची उभारणी करूननागरिकांना शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, रेल्वे स्थानक या सुविधा मिळतील, याची काळजी विकासकांनी घेण्याचा सल्लाही वाधवा यांनीदिला.
विकासकांनी परवडणारी घरे उभारावीत - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:39 AM