पालघर : जिल्ह्यातील आठही तालुक्यांना समान न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यासाठी पूर्ण पालघर जिल्ह्यात सुंदर आणि भक्कम असे रस्त्यांचे जाळे तयार करून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा आदीवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी पालघर येथे केले.राज्य शासनाच्या वर्षापूर्तीचे औचित्य साधून पालकमंत्री सवरा यांच्या हस्ते प्रतिकात्मक स्वरुपात पालघर येथील गणेशकुंड येथे अंदाजीत १३ कोटी ८३ लाखांच्या २२ विकास कामांचा शुभारंभ शनिवारी झाला. यावेळी खासदार चिंतामण वनगा, नगराध्यक्ष प्रियंका पाटील, जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले, जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे, सभापती रविंद्र पागधरे, कार्यकारी अभियंता राहुल वसईकर, उदय पालवे, तहसीलदार चंद्रसेन पवार आदी मान्यवर उपस्थित होते. रस्त्यांशिवाय जिल्ह्यात पर्यटन केंद्र म्हणून विकास होणार नाही. याची जाणीव ठेऊन सुंदर आणि भक्कम अशा रस्त्यांचे जाळे तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. पालघर शिरगाव रस्ता, पारगाव फाटा ते सोनावे दारशेत रस्ता, केळवा स्टेशन ते केळवा दांडा रस्ता, झाई बोर्डी रेवस रेड्डी रस्ता, संजाण-तलासरी-कासा रस्ता, वासगाव रस्ता, बावडा गावांतर्गत रस्ता, बोईसर, आळेराडी, मुरसे, खारेकुरण रस्ता, सायवन किन्हवली रस्त्यावरील पूल आदी २२ विकासकामांचे भुमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.
जिल्ह्याचा विकास करणार-वनगा
By admin | Published: November 02, 2015 1:32 AM