ठाणे - डायघर आणि परिसरातील खिडकाळी, पडले, देसाई व सांगर्ली या गावांच्या एकात्मिक विकास योजना राविण्याच्यादृष्टीने पालिकेने आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे. या भागाचा पाहणी दौरा अतिरिक्त आयुक्तांनी केला आहे. त्यानंतर आता या गावांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार असून या गावांना शहरी भागाशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात येऊन ते महासभेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहेत. परंतु या गावांचा विकास करीत असतांना येथील अनाधिकृत बांधकामे ही पालिकेसाठी मोठा चितेंचा विषय असून तो सोडविण्यासाठीसुध्दा हालचाली केल्या जाणार आहेत. डायघर आणि परिसरातील खिडकाळी, पडले, देसाई व सांगर्ली या गावांच्या एकात्मिक विकासाच्यादृष्टीने ग्रामस्थांच्यावतीने नगरसेवक बाबाजी पाटील, संतोष किणे, संतोष पाटील, गणेश म्हात्रे, गोविंद भगत यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेवून तेथील विकास कामाच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यानंतर या भागाचा पाहणी दौरा करण्याचे आदेश आयुक्तांनी दोनही अतिरिक्त आयुक्तांना दिले होते. त्यानुसार गुरुवारी या दोघांनीही या भागाचा पाहणी दौरा केला आहे. एकीकडे ठाणे शहर स्मार्टसिटीच्या दिशेने वेगान प्रवास करीत असताना दुसरीकडे मात्र महापालिका हद्दीत असूनही येथील भाग आजही कसा विकासापासून वंचित राहिला आहे, याची माहिती त्यांना या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने मिळाले आहे. गटार, पायवाटा, रस्ते, शौचालये, दिवा बत्ती, आरोग्याच्या सोई सुविधा यापासून कोसो दूर ही गावे असल्याची बाबही समोर आली आहे. या गावांची लोकसंख्या सुमारे दिड लाखांच्या आसपास असून येथील रहिवाशांना कोणत्या मुलभुत सोई सुविधांची गरज आहे, याची माहितीसुध्दा यावेळी घेण्यात आली आहे. त्यानुसार या माहितीच्या आधारे आता या गावांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार शीळ येथे उपप्रभाग कार्यालय निर्माण करणे, खिडकाळी आणि डायघर येथे दोन उद्यानांची निर्मिती करणे, खिडकाळी-डायघर येथे स्टेडीअम बांधणे व मैदाने विकसित करणे, शीळ आणि देसाई येथे आरोग्य केंद्र बांधणे, पडले येथे ज्युनियर कॉलेज आणि शाळांची दुरूस्ती, डायघर येथील शाळेचे वाढीव मजल्याचे काम, देसाई येथे आरोग्य केंद्र, प्रसुती गृह तसेच ट्रॉमा सेंटरचे बांधकाम, डायघर येथे आगरी समाज भवन बांधणे, या परिसरातील स्मशानभूमींचे सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण, परिसरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते बांधणे, पदपथ आणि विद्युत कामे, पाणी पुरवठा, मलिन:सारण आदी कामे येत्या काळात केली जाणार आहेत. यासाठी किती खर्च येऊ शकतो, त्यादृष्टीने हा विकास आराखडा तयार केला जाणार आहे.दिवा भागाचा ज्या पध्दतीने विकास आराखडा तयार करण्यात येऊन या भागातील विकास कामांना नोव्हेंबर महिन्याच्या महासभेत मंजुरी मिळाली. त्यानुसार आता डायघर आणि आजूबाजूच्या गावांचा विकास केला जाणार असून नवे घोडबंदर म्हणून येत्या काळात या भागाचा विकास केला जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
- या भागात सर्वात मोठी समस्या ही अनाधिकृत बांधकामांची असून येथे सोई सुविधांची वाणवा असली तरीसुध्दा अनाधिकृत बांधकामांचे प्रमाण हे जास्तीचे आहे. त्यामुळे या बांधकामांचे करायचे काय असा पेच सध्या पालिकेला सतावू लागला आहे. परंतु या बांधकामाबाबत कोणती योजना राबविली जाऊ शकते, याचाही अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर अॅफोर्डेबेल हाऊसिंगची स्किमची राबवता येऊ शकते का? याचीही चाचपणी केली जाणार आहे.