उल्हासनगर : महापालिका प्रभागातील अत्यावश्यक कामांसाठी नगरसेवकांना निधी देण्याची मागणी शिवसेना शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे केली आहे. तसेच पाणीगळती, स्वच्छता दुरुस्ती करण्याची मागणी केल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी पत्रकारांना दिली.
उल्हासनगर महापालिका नगरसेवकांना गेल्या दोन वर्षांपासून निधी मिळाला नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. नगरसेवकांची खदखद चौधरी यांच्याकडे गेल्यावर त्यांनी बुधवारी आयुक्तांची भेट घेतली. नगरसेवकांना निधी मिळत नसल्याने प्रभागातील कामे करता येत नसल्याची माहिती त्यांनी आयुक्तांना दिली. आयुक्तांनी त्वरित नगरसेवक निधी देण्याची मागणी मान्य केली. तसेच शहरातील विकासकामांसह इतर कामांची चर्चा केल्यानंतर पाणीगळतीने लाखो लीटर पाणी वाया जात आहे.
ही गळती बंद करण्यासाठी प्रभागानुसार पथक स्थापन करावे, अशी विनंती आयुक्तांना केली. तसेच शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली. शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर विरोधी पक्षनेते किशोर वनवारी यांच्यासह विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन विकासकामांबाबत चर्चा केली. दरम्यान, नियोजित कामे न होता त्यांची बिले निघत असल्याचा आरोप नगरसेविका ज्योती चैनानी यांनी केला. आयुक्तांनी चौकशी केल्यास काेट्यवधींचा घोटाळा बाहेर निघेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बाेलतांना व्यक्त केली.
नगरसेवकांमध्ये पसरताेय असंतोषगेल्या दोन वर्षांपासून नगरसेवकांना हक्काचा नगरसेवक निधी मिळत नसल्याने, त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया सभागृह नेते भरत गंगोत्री यांनी दिली. आयुक्तांनी वेळीच नगरसेवकांना निधी दिला नाहीतर, नगरसेवकांना रस्त्यावर उतरावे लागेल, अशा इशाराही त्यांनी दिला आहे.