सदानंद नाईक, उल्हासनगर : हजारो कोटीच्या विकास कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेच्या ६ अभियंतावर येऊन पडली आहे. त्यांच्या दिमतीला सेवानिवृत्त व कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती महापालिकेने केली असून सुरू असलेल्या विकास कामावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.
उल्हासनगर महापालिका हद्दीत ४२६ कोटींची भुयारी गटार योजना, १५० कोटीची एमएमआरडीएची रस्ते योजना, १२३ कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना, ४३ कोटीच्या निधीतून मूलभूत सुखसुविधा योजना आदी १ हजार कोटीची कामे कार्यान्वित झाली आहेत. मात्र या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडे फक्त एकून ६ अभियंता पदे असून प्रत्येकावर ३ ते ४ पदाचा पदभार देण्यात आला. त्यांच्या मदतीला ७ सेवानिवृत्त अभियंत्यांची तात्पुरत्या स्वरूपात तर १८ कंत्राटी नवखे अभियंते नियुक्त केले आहेत. शहरातील विकास कामाची सर्व जबाबदारी या ६ अभियंतावर येऊन पडली असून त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फ़ैरी झडत असल्याने तेही वादात सापडले आहेत.
शहरातील हजारो कोटीच्या विकास कामावर नियंत्रण ठेवण्यात महापालिकेचे हे ६ अभियंता कमी पडत असून विकासकामे निकृष्ट होत असल्याचा आरोप होत आहेत. महापालिका बैठका, मंत्रालय, जिल्हाधिकारीसह अन्य ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमतच या अभियंताचा वेळ जात असून विकास कामावर कोण नियंत्रण ठेवणार? असा प्रश्न पडला आहे. यापूर्वी ४०० कोटीच्या निधीतून राबविलेली पाणी पुरवठा वितरण योजनेचा असाच बोजवारा उडल्याची टीका होत आहे. ४२६ कोटीच्या निधीतील भुयारी गटार योजने अंतर्गत कोणतेही रस्ते खोदण्यात येत असून टाकण्यात येत असलेल्या गटार पाईपवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. पूर्वीपेक्षा लहान आकाराचे पाईप टाकण्यात येत असल्याचा आरोप होत असून योजनेची ब्ल्यूप्रिंट महापालिकेकडे नसल्याचे बोलले जात आहे. तसेच नव्याने बांधण्यात येत असलेले रस्ते शहरविकास आराखड्यानुसार नसल्याने, त्याबाबतही नागरिकांकडून आरोप होत आहे.
अशोक नाईकवाडे (उपायुक्त- महापालिका) - महापालिकेकडे सद्यस्थिती एकून ६ अभियंता पदे असून तात्पुरत्या स्वरूपात ७ सेवानिवृत्त अभियंता व १८ अभियंता कंत्राटी पद्धतीने घेतले आहेत. अभियंता पदाची लवकरच भरती होणार असून जाहिरात प्रक्रिया सुरू आहे.
संदीप जाधव (शहर अभियंता-महापालिका) - महापालिका हद्दीत १ हजार कोटीच्या निधीतून विविध विकास कामे सुरू आहेत. तसेच प्रस्तावित कामेही शासन दरबारी आहेत. अभियंता पदे कमी असल्याने, दबाव वाढला आहे.