ठाणे - अनेक धक्कादायक घडामोडींनंतर गेल्या आठवड्यात राज्यात सत्तांतर झालं. मात्र त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने अनेकांना आश्चर्चाया धक्का बसला होता. दरम्यान, हा बदल स्वीकारत नव्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारे बॅनर ठिकठिकाणी लागत आहेत. मात्र त्यामध्ये एके ठिकाणी बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचं नावच बदलून टाकण्यात आल्याने या बॅनरची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
मीरा रोडमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावले असून, त्यामध्ये चक्क देवेंद्र फणडवीस यांचं नाव देवेंद्र फर्नांडिस असं लिहिलं गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आता या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच त्यावरून नेटिझन्सच्या क्रिएटिव्हिटीलाही आयते खाद्य मिळाले आहे.
मिरा-भाईंदरमधील नगरसेवक विक्रम प्रताप सिंह यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. मात्र या बॅनरमधील इतर उल्लेख बरोबर आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या टायपिंगमध्ये गलती से मिस्टेक झाल्याने हा बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.