अंबरनाथ : महाशिवरात्री निमित्त येथील ९५८ वर्षे पुरातन शिवमंदिरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. नगराध्यक्षा मनिषा वाळेकर आणि सहायक पोलीस आयुक्त सुनिल पाटील यांनी ग्रामस्थ, पुजारी आणि भाविकांचे आभार मानले. यंदा प्रथमच भाविकांना सुरक्षेसाठी शिवमंदिरात खाली गाभाऱ्यात दर्शनासाठी सोडण्यात आले नव्हते. हा बदल भाविकांनी मनापासून स्वीकारत पोलीस व पालिका प्रशासनाला सहकार्य केल्याने महाशिवरात्रीची यात्रा शांततेत व उत्सहात पार पडली.
महाशिवरात्री निमित्त येथील प्राचीन शिवमंदिरात ठाणे, मुंबई, रायगड, नासिक आदी जिल्ह्यातून अक्षरशः लाखो भाविक दर्शनासाठी नित्य नेमाने येत असतात. काल रात्री साडेबारा पासून दर्शनास प्रारंभ झाला. त्याआधी ग्रामस्थ व पुजारी यांनी दहा ते बारा या दरम्यान अभिषेक व पूजा केली. त्यानंतर दर्शनास प्रारंभ करण्यात आला. भाविकही शांततेने रात्री दहा वाजल्यापासून रांगेत उभे होते. आतापर्यंत भाविकांना मंदिरात शिवलिंगापर्यंत गाभाऱ्यात दर्शनासाठी सोडण्यात येत असे मात्र यंदा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या सभागृहातील पायरी पर्यंतच प्रवेश देण्याची सूचना पोलीस आणि पालिका प्रशासनाने केली होती. या सूचनेला ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांनी तसेच भाविकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
सहायक पोलिस आयुक्त सुनिल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा आणि त्यांची संपूर्ण टीम काल दुपारपासूनच या शिवमंदिर परिसरात तैनात होती. नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, काँग्रेसचे अध्यक्ष तथा गटनेते प्रदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सदाशिव पाटील, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष भरत फुलोरे, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष कुणाल भोईर आदी मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेतला. महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी दर्शनाचा आणि यात्रेचा लाभ घेतला.
यंदा प्रथमच शिवमंदिरात दर्शनाला बंदी घातली मात्र ग्रामस्थ, पुजारी, आणि भाविकांनी सहकार्य केल्या बद्दल नगराध्यक्षा मनिषा वाळेकर व सहायक पोलीस आयुक्त सुनिल पाटील यांनी सर्वांचे खास आभार मानले आहेत. तसेच, भाविकांचे आणि सर्वांचे सहकार्य लाभल्याने ही यात्रा सुरळीत व शांततेत पार पडली असल्याचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल पाटील यांनी सांगितले.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता सहायक पोलीस आयुक्त सुनिल पाटील आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोळी निरीक्षक मनजितसिंग बग्गा या परिसरात लक्ष ठेवून होते. अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने व टीम तैनात होती. स्वच्छतेबाबत वरचेवर सूचना देण्यात येत होत्या. शहरातील सर्व राजकीय,शैक्षणिक आणि सामाजिक संघटनांनी येणाऱ्या भाविकांच्या सोयी साठी पाणी, फराळ आदींची सोय केली होती.