ठाणे : सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते क्लोनिंगपर्यंत अनेक गोष्टींवर महर्षी व्यासांनी लिहिले आहे. भौतिक ज्ञान देतो तो शिक्षक, न्याय, व्याकरण, मिमांसा शिकवणारे आचार्य, वेदांत, वैदिक ज्ञान, आत्मज्ञान ज्ञान देतात ते गुरू. माणसाच्या आयुष्यात भक्तिरस हा निर्माण करावा लागतो, तर बाकीचे रस आपोआप निर्माण होतात. इंद्रीय, मन, बुद्धी, आत्मतत्त्व या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन कादंबरीकार, निरुपणकार व संहिता लेखक राजेंद्र खेर यांनी केले.
आम्ही विश्व लेखिका या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या महिला साहित्यिकांच्या संस्थेने गुरुपौर्णिमेनिमित्त ऑनलाइन सोहळा आयोजित केला होता. त्यामध्ये अध्यक्षपदावरून खेर बोलत होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटक, संस्कृती प्रकाशनच्या सर्वेसर्वा व लेखिका सुनीताराजे पवार होत्या. आम्ही विश्व लेखिका या संस्थेचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, आता जरी गुरुकुल पद्धती राहिली नसली तरीही समाज हाच एक गुरुकुल असून, येणाऱ्या अनुभवातून आपण शिकत जातो आणि त्यामुळे परिस्थिती व समाज दोन्ही आपले गुरू आहेत. भाषा व लिपी या माध्यमातून माणसाची व्यक्त होण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितली.
या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ज्येष्ठ लेखिका व कवयित्री डॉ. संजीवनी तोफखाने या होत्या. गुरू-शिष्यांच्या अनेक जोड्या, संत परंपरेतील अनेक जोड्यांची उदाहरणे त्यांनी दिली. गुरू हा नेहमी आपल्यापेक्षा वयाने मोठाच असावा असे काही नाही. आजकाल तंत्रज्ञान शिकत असताना लहान मुले ही आपली गुरू होतात, असेही त्या म्हणाल्या. परीस हा लोखंडाला सोने बनवतो, परंतु तो दुसरा परीस बनवू शकत नाही. गुरू मात्र शिष्याला ज्ञान देऊन त्याचा गुरू बनवू शकतो. त्यामुळे परिसापेक्षाही गुरु मोठा आहे, असे त्या म्हणाल्या. आम्ही विश्व लेखिका संस्थेच्या अध्यक्ष प्रा. पद्मा हुशिंग यांनी समारोप केला.