ठाणे : पहिली ट्रेन ठाण्यात धावली आणि आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाºया जगातील दुसºया आणि भारतातील पहिल्या डीजीसीटी प्लॅटफॉर्मचा मानही ठाण्याला मिळाला, याचा आनंद आहे. त्यातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन असल्याने, आजच्या दिवसाला विशेष महत्त्व असल्याचे मत शिवसेनेचे नवनिर्वाचित नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.ठाणे पालिकेच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात मंगळवारी दुपारी ४ वाजता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते डीजी ठाणे प्लॅटफार्मचा लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, इस्रायलच्या तेल अवीव जाफा शहराचे महापौर डॉ. रॉन हुलदाय आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.ठाणे पूर्वी ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जात होते. आता ते डिजिटल शहर म्हणून ओळखले जाणार आहे असे सांगतानाच नेतेपदी नियुक्ती झाल्याने आनंद होत आहे, परंतु आता खूप काम करण्याची जबाबदारी खांद्यावर येऊन पडली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.इस्रायलमधील तेल अवीव शहराचे महापौर डॉ. रॉन हुलदाय म्हणाले, २०१४ मध्ये आम्ही हा प्रकल्प सुरू केला होता. भारतात ठाण्याने त्यात पहिला पुढाकार घेतला, परंतु आमच्या वेगाने ठाणे धावेल का? याबाबत मनात शंका होती, परंतु त्यांनी कमी वेळेत हे स्वप्न साकार करून दाखविल्याचेही त्यांनी सांगितले.अॅपचे लोकार्पण झाल्यानंतर, अवघ्या एका तासात तब्बल १ हजार ठाणेकरांनी हे अॅप डाउनलोड केल्याची घोषणा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली.
डीजीसीटीचा पहिला मानही ठाण्यालाच मिळाला : आदित्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 3:31 AM