शेणवा : मनमानी कारभार करणाऱ्या शहापूर तहसीलदारांच्या बदलीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार यांचे दालन हे मर्जीतील ठराविक लोकांचे उठबस करण्याचे ठिकाण झाले असल्याचा आराेप करून कार्यकाळ शासकीय नियमानुसार संपला असतानाही तहसीलदारांना पुढील सहा महिन्यांची मुदतवाढ कोणत्या अनुषंगाने दिली, याचा खुलासा व्हावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शैलेश बिडवी, शहापूर तालुकाध्यक्ष जयवंत मांजे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा शहापूर तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला होता. या वेळी तहसीलदारांच्या विरोधात असलेले तक्रारीचे निवेदन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. मंगळवारी निघालेल्या मनसेच्या धडक मोर्चात मोठ्या संख्येने मनसेचे हजारो पुरुष, महिला कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्या कार्यकाळात जागामालक बिल्डर व व्यापाऱ्यांना महसूल विभागाकडून मोठमोठ्या रकमेच्या दंडाच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले याचा शोध घ्यावा. कलम १५५ नुसार ७/१२ दुरुस्ती प्रकरणे तसेच वर्ग २ नवीन शर्त इनामी व आदिवासी लोकांना वनहक्क कायद्यानुसार फॉरेस्ट प्लॉट वाटपाचे सातबारा नावावर करण्यासाठी असलेली प्रलंबित प्रकरणांची चौकशी व्हावी, कोतवालांची बदली तहसीलदार करू शकतात का, याचा खुलासा व्हावा आदी मागण्या करण्यात आल्या.