डोंबिवली : एमआयडीतील निवासी भागातील उष्मा पेट्रोलपंपानजीकचा भूखंडा हा निसर्ग उद्यानासाठी आरक्षित असताना तो मार्बल कंपनीला कमी दराने देण्यात आला आहे. या प्रकरणाची फाइल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मागविली आहे. विधिमंडळ कामकाजासाठी ही माहिती हवी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.‘लोकमत’च्या ‘हॅला ठाणे’ पुरवणीत १ आॅक्टोबरला या विषयीचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या संदर्भात नागरिक राजू नलावडे यांनी विविध ठिकाणी तक्रारी करत त्याकडे लक्ष वेधले होते. माहिती अधिकारात नलावडे यांनी ही बाब उघडकीस आणली होती. त्याची तक्रार एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली होती. मात्र, दीड महिना उलटूनही एमआयडीसीने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नव्हती. मात्र, विरोधी पक्ष नेते मुंडे यांनी त्याची दखल घेतली आहे.एमआयडीसी निवासी परिसरातील या मोकळ््या भूखंडावर कारखान्यांचा व २७ गावांतील कचरा टाकला जात होता. याप्रकरणी उच्च न्यायालयात लढा देऊन हे बेकायदा डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात आले. त्या जागेवर निसर्ग उद्यान फुलविण्याचे एमआयडीसीने कबूल केले होते. मात्र, ११ हजार चौरस मीटरचा हा भूखंड मार्बल कंपन्यांना कमी दराने देण्यात आला आहे. औद्योगिक वापराचा भूखंड वाणिज्य वापरासाठी कसा दिला जाऊ शकतो? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.>विधान परिषदेत प्रश्न?एमआयडीसीने प्रथम निसर्ग उद्यान सुरू करण्याचे सांगूनही त्याच भूखंडावर मार्बल उद्योजक कसे काय आले? भूखंड देताना वृत्तपत्रात जाहिरात दिली होती का?, यापूर्वीही गैर प्रकारे भूखंडांचे वाटप झाले आहे. मात्र, मुंडे यांनी दखल घेतल्याने काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. हा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला जाऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.
धनंजय मुंडे यांनी मागवली ‘ती’ फाइल, कार्यवाहीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 3:10 AM