ठाणे : हल्ली 'धर्म' हा शब्द उच्चारणे भीतीदायक झाले आहे. धर्म याचा खरा अर्थ धर मग म्हणजेच समाजाला धर, एकत्र कर असा आहे. जो धरतो, धारण करतो तो धर्म. विभक्त करतो तो धर्म नाही. मात्र दुर्दैवाने धर्म या शब्दाचा खरा अर्थ कळणारी माणसे राजकारणाकडे वळत नाहीत. ज्यांना धर्म या शब्दाचा अर्थ माहिती नाही अशी माणसे राजकरणात असल्याने देश विघाताकडे वळत असल्याचे मत निरुपणकार धनश्री लेले यांनी पसायदानातील 'विश्व स्वधर्म सूर्ये पाहो' या पंक्तीचा अर्थ सांगताना व्यक्त केले.
सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पंधराव्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प निवेदिका धनश्री लेले यांच्या पसायदान काल व आज यावरील व्याख्यानाने श्री सिद्धिविनायक मंदिराचे पटांगण येथे गुंफण्यात आले. पसायदानात विश्वाने स्वधर्माचा सूर्य पाहावा, म्हणजेच प्रकाश पाहावा असे म्हंटले आहे. मात्र स्वधर्म म्हणजेच स्वकर्म. प्रत्येकाने आपले काम शंभर टक्के पूर्ण करावे म्हणजे स्वधर्म. स्वकर्म न करणाऱ्यांना स्वधर्मविषयी बोलणायचा अधिकार नाही असे पुढे त्या म्हणाल्या. पसायदान हे एक प्रकारचे मागणे आहे. मात्र हे मागणे त्याच्याकडेच मागावे जो देऊ शकतॊ. देणारा तो देव, त्याच्याकडे हे मागणे असल्याचे लेले म्हणाल्या. पसायदानातील प्रत्येक ओळीचा व त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ लेले यांनी उलगडून दाखविला. ज्ञानेश्वर माउलींनी प्रत्येक शब्द किती जाणीवपूर्वक वापरला असल्याचे यातून प्रतीत होत होते. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भू मंडळी भेट तू भुता या ओळीचा भावार्थ सांगताना ईश्वरनिष्ठ, चांगली, बुद्धीमानी मंडळी एकमेकांना भेटली पाहिजेत असे यात सांगितले आहे. परंतु असे होत नाही. भारत स्वतंत्र झाल्यावर अतिशिक्षित व उच्च विद्याविभूषित मंडळी समाजापासून तुटतात अशी खंत महात्मा गांधी यांनी व्यक्त केल्याचे लेले यांनी यावेळी सांगितले. यावरूनच ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात सांगितलेल्या गोष्टी आजही सांगितल्या जात असून त्यांचे साहित्य आजच्या काळातही महत्वाचे व तितकेच उपयुक्त असल्याचे शेवटी धनश्री लेले यांनी नमूद केले.