- नितिन पंडीतभिवंडी - केंद्र व राज्य सरकार कडून हमी भावाने खरेदी केलेल्या भाताला अनुदान जाहीर करावे,प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवा ,मुंबईची तहान भागविणाऱ्या धरण क्षेत्रातून शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे या व अशा अनेक मागण्यांसाठी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
कोकणात भातशेती हे एकच उपजीविकेचे साधन शेतकऱ्याकडे असून अवकाळी पाऊस,बियाणांचे मजुरीचे वाढलेले दर या मुळे शेतकरी अखेरच्या घटक मोजत असून त्याला जगवायचे असल्यास रोजगार हमी योजनेतून शेती लावून मिळावी,समृद्धी महामार्ग मुंबई वडोदरा महामार्ग या मध्ये बाधित शेतकऱ्यांना मोबदला देताना दरात केलेली तफावत दूर करून शेतकऱ्यांना ती रक्कम देण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांना देण्यात आले .विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कुणबी सेनेचे सरचिटणीस डॉ विवेक पाटील,जिल्हाध्यक्ष शरद पाटील,महिला जिल्हा अध्यक्षा अँड वैशाली घरत,भिवंडी तालुकाध्यक्ष भगवान सांबरे,शहापूर तालुकाध्यक्ष दिनेश निमसे, जिल्हा परिषद सदस्य दयानंद पाटील यांसह मोठ्या संख्येने समाज बांधव स्त्री पुरुष सहभागी झाले होते .