डोंबिवली - राज्याची सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीत यंदाही ढोलताशांचा तालसंग्राम गर्जणार आहे. 26 आणि 27 जानेवारीला सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात होणाऱ्या या ढोल ताशा स्पर्धेत राज्यभरातील 16 पथकं सहभागी होणार असल्याची माहिती आयोजक आरंभ प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
यंदाच्या ढोलताशा स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांची समारोपाच्या दिवशी म्हणजेच 27 जानेवारी रोजी प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर यंदाच्या स्पर्धेत डोंबिवली, पुणे , चिपळूण, रत्नागिरी, औरंगाबाद, फलटण, उरण, कल्याण, भिवंडी आदी ठिकाणची तब्बल 16 पथकं सहभागी होणार असल्याची माहिती आरंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष निशांत चव्हाण यांनी दिली.
तसेच या स्पर्धेत विजयी पथकांसाठी प्रथम पारितोषिक १ लाख ५० हजार, द्वितिय पारितोषिक १ लाख तर तृतीय ५० हजार रुपयांचे पारितोषिक असणार आहे. त्याचजोडीला उत्कृष्ठ ढोल, ताशा, टोल, ध्वजधारीं यांसाठीही प्रत्येकी १० हजार रुपयांचे पारितोषिक असणार आहे.
आरंभ प्रतिष्ठान’ हे ढोल ताशा व लाठी काठी पथक असून गेली अनेक वर्षे डोंबिवलीसह राज्यात विविध ठिकाणी या संस्थेने आपल्या महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे स्पर्धेचे मुख्य सल्लागार अनिकेत घमंडी यांनी सांगितले.