ठाणे : ‘हम दो शिफ्ट मे काम करते है. पर जो दिन मे काम करता है उसको धूप बहुत लग रही है. आज धूप बहुत हैं, सर पे टोपी भी नही है. सर, धूप से बचने के लिये टोपी तो दिला दो. आप किसी को तो कहो की हमे धूप बहुत लग रही हैं और टोपी चाहिए,’ अशा शब्दांत रणरणत्या उन्हात काम करणाऱ्या कामगारांनी आपली व्यथा ‘लोकमत’कडे मांडली.
ठाणेरेल्वे स्थानकात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कामगारांना किमान सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत. देशात उष्माघाताने ४१ जणांना मृत्यू झाला असताना व मुंबईत उष्माघाताने तिघांना त्रास झाला असतानाही रेेल्वे प्रशासनाने पुरेशी काळजी घेतलेली नाही.मध्य रेल्वेच्या ६३ तासांच्या मेगाब्लॉकचा शनिवारी दुसरा दिवस होता. एकीकडे प्रवाशांची गर्दी, गोंधळ होता. गाड्या उशिराने धावत होत्या, तर दुसरीकडे मेगाब्लॉकमध्ये करण्यात येणारे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कामगारांची तारेवरची कसरत चालू होती.
५०० कामगारांचे राबले हात सकाळी ८ वाजल्यापासून काम केल्यावर दुपारी भूक लागलेल्या कामगारांनी १ वाजण्याच्या सुमारास जेवण घेतले. कामाचा ताण घालवण्यासाठी थोडा आराम केला. कोणी प्लॅटफॉर्मवर झोपले. कोणी पेवर ब्लॉकवरती पाठ टेकली. जिथे जागा मिळेल, तिथे आराम करत होते. कोणी मोबाइल वरती आपले मनोरंजन करून घेत होते. सुमारे ५०० कामगार या कामांमध्ये गुंतल्याची माहिती स्टेशन मास्तर किशोर तावडे यांनी दिली. हे कामगार उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगाल येथून आले असल्याचे त्यांनी सांगितले.
रात्री ज्यांना काम करण्यासाठी आम्ही टोपी देतो, त्यांनी ती टोपी ठेवून जायचे असते. मात्र, ते घेऊन गेले. त्यामुळे या लोकांना आम्ही टोपी कुठून देणार, असे उत्तर कंत्राटदारांनी दिले.