ठाणे : सकस आहार, योग्य व्यायाम आणि नियमित औषधोपचार ही त्रिसुत्री पाळल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. असा मौलिक सल्ला मधुमेहतज्ज्ञ डॉ.तुषार रेगे यांनी ठाणेकरांना दिला. ठाण्यातील रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत "डायबेटीस अपाय आणि उपाय" या विषयावर डॉ.रेगे यानी श्रोत्यांना डायबेटीक फूट आजाराबाबत आरोग्यमंत्र दिला. यावेळी व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष स्त्रीरोगतज्ञ डॉ. महेश जोशी, दुरदर्शन कलावंत माधुरी ताम्हाणे आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर होते.
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात शरीराकडे दुर्लक्ष झाल्याने आरोग्याच्या समस्या डोके वर काढतात. या समस्या जाणून त्यावर वेळीच उपाय केल्यास त्या आजारावर नियंत्रण मिळवता येते. असे नमुद करून डॉ.तुषार रेगे यांनी, मधुमेह काय आहे ? मधुमेह कशामुळे होतो आणि मधुमेह झाला तर, काय करायला हवे ? यावर विवेचन केले.तसेच, सकस आहार,योग्य व्यायाम आणि नियमित औषधोपचार केल्यास मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते असे स्पष्ट केले. मधुमेह कुणालाही होऊ शकतो. भारतात ९ कोटी मधुमेही रुग्ण असुन त्यांच्या १८ कोटी पायांची काळजी घेणे जिकिरीचे बनले आहे.
देशात दरवर्षी १ लाख रुग्णांचे पाय कापण्याच्या शस्त्रक्रिया होतात. मधुमेहामध्ये तुमचे शरीर रक्तातील साखर नियंत्रित करणार्या इन्सुलिन हार्मोन्सचे उत्पादन कमी करते किंवा असंवेदनशील बनते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोज वाढू लागते. यासाठी मधुमेहींना दोन प्रकारची औषधे असतात.एक गोळ्या आणि दुसरे इन्सुलीन होय, असे नमुद करून डॉ. रेगे यांनी, इन्सुलीनबाबत अनेक मतमतांतरे असली तरी इन्सुलीन हे नैसर्गिक असुन यामुळे स्वादुपिंडात इन्सुलीन तयार होऊन शुगर नियंत्रणात करता येत असल्याचे सांगितले.
डायबेटीक फुट या आजारात रक्तात शुगर मिसळुन नसा कमकुवत होतात. हा आजार जडलेल्या माणसाला दोन सुदृढ माणसे सोबतीला लागतात. या आजाराचे दोन प्रकारे वर्गीकरण होते, एक डायबेटीक न्युरापॅथी, यामध्ये पायातील संवेदना नष्ट होत जातात. तर, डायबेटिक अँजिओपॅथीमध्ये पायाला रक्तपुरवठा कमी होतो. तेव्हा, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवली व पायांची नियमित काळजी घेतली तर, डायबेटीक फूट सारखे गंभीर आजार टाळले जाऊ शकतात. असा सल्लाही डॉ. रेगे यांनी दिला.
डायबेटीक फुट ही सामाजिक - आर्थिक समस्यारक्तात शुगर वाढली की जसे साखरेकडे मुंग्या गोळा होतात तसेच शरीरातील साखरेकडे बॅक्टेरीया रुबीकटस हे जंतु आकृष्ठ होतात. अनेकदा लक्षण दिसली नाही तरी मधुमेहाचे अचूक निदान करण्यासाठी रक्तचाचणीच कामी येते. यात डायबेटीक फूट हा आजार म्हणजे एक मोठी सामाजिक व आर्थिक समस्या बनल्याचे डॉ.रेगे सांगतात. पाय सतत जमिनीच्या संपर्कात असल्या कारणाने तळपायांच्या जखमांमध्ये प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावते. तेव्हा, या आजारात प्रत्येकाने आपले पाय स्वतः अथवा इतरांच्या मदतीने दररोज तपासुन घेण्याचा साधा उपाय त्यांनी सुचवला.